आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम महाराष्ट्र : संपादकांच्या नजरेतून...‘शुगर बेल्ट’मध्ये भाजप - शिवसेनेचा शिरकाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहकारी चळवळ फोफावण्याच्या अगोदरपासूनच पश्चिम महाराष्ट्रावर काँग्रेसची व महाराष्ट्रावर पश्चिम महाराष्ट्राची राजकीय पकड होती. सहकारी साखर कारखानदारी वाढल्यानंतर ती पकड आणखीन घट्ट होत गेली. साखर उत्पादनाची आकडेवारी पाहिली, तरी त्या मागचे कारण लक्षात येते. महाराष्ट्रातील एकूण साखर उत्पादनापैकी (७७१.९९ लाख क्विंटल) ६१ टक्के (५२८.४२ लाख क्विंटल) साखर पश्चिम महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यांतून गेल्या गळीत हंगामात झाली. कोल्हापूर, सोलापूर, पुणे ही उत्पादनाची क्रमवारी आहे. काँग्रेसने आजवर पश्चिम महाराष्ट्रातून सहा मुख्यमंत्री दिले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीही पश्चिम महाराष्ट्राचा, असे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या संसारात दोन वेळा झाले. या प्रभुत्वाला सुरुंग लागला गेल्या लोकसभा निवडणुकीत. दहा जागांपैकी फक्त चार खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. काँग्रेसला तर शून्य जागा होत्या. राष्ट्रवादीलाही पश्चिम महाराष्ट्राशिवाय कुठेही जागा मिळवता आली नाही.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिणमधल्या स्वत:च्या लढतीमध्ये फारशी चिंता दिसत नाही. संस्थात्मक ताकद भरपूर असलेल्या विलासकाका उंडाळकरांच्या मागे राष्ट्रवादीने ताकद लावली; परंतु त्यानंतरही फारसा बदल होण्याची स्थिती नाही. सातव्या आमदारकीनंतर तिकीट कापल्याने अन्याय झाला, ही उंडाळकरांबाबतची भावनाही आता नाही. पृथ्वीराज यांना विरोधासाठी राष्ट्रवादी व अन्य विरोधकांनी प्रचारासाठी तेथे फार गर्दी केलेली नाही. आघाडीतल्या घटस्फोटानंतर शरद पवारांनी व चव्हाणांनी एकमेकांवर आरोप खूप केले; पण पवार अजूनही कराड दक्षिणकडे फिरकले नाहीत. गडकरी, आर. आर. पाटील, अजित पवार, राजू शेट्टी या व्यतिरिक्त अजून तरी कोणी आले नाही. उमेदवारी अर्ज भरल्यापासून पृथ्वीराज चव्हाण हे फक्त सव्वाचार दिवस मतदारसंघात राहिले. सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर शुगर लॉबीचा प्रभाव खूप असतो; परंतु चव्हाणांकडे एखादी पतसंस्थाही नाही. त्यांच्या विरोधातले उंडाळकर व अतुल भोसले (भाजप) हे शुगर लॉबीतलेच नेते. पाटणमध्ये शिवसेनेचे शंभूराजे देसाई हे चांगल्या स्थितीत आहेत; पण तेही शुगर लॉबीतलेच. पुणे जिल्ह्यातल्या २१ पैकी ग्रामीण भागातल्या सर्व १० मतदारसंघांवर शुगर लॉबीचे म्हणजेच राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. बारा सहकारी व पाच खासगी साखर कारखान्यांत बहुतेक ठिकाणी राष्ट्रवादीचेच नेते आहेत. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे या निवडणुकीत अडचणीत आल्याचे दिसते. इंदापूरभोवतालच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शक्तींनी हर्षवर्धन यांच्या भोवतीचा वेढा कडक केला आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय भरणे त्यांच्या विरोधात आहेत. बारामती, आंबेगाव, पुणे कॅन्टॉनमेंट, शिवाजीनगर हे चार मतदारसंघ वगळता अन्य सर्व ठिकाणी ठाम काही सांगावे, अशी स्थिती नाही. येथील प्रस्थापितांच्या पोटात गोळा उठावा अशी स्थिती दिसते. हर्षवर्धन पाटीलही त्याला अपवाद नाहीत. मोदींच्या सभेचा परिणाम बारामती मतदारसंघात दिसणार; पण तो अजित पवारांचे मताधिक्यावर कमी करण्यापुरता मर्यादित असेल.

वसंतदादा पाटील यांच्यापासूनच सांगलीच्या राजकारणावर शुगर लॉबीचा प्रभाव आहे. आजही येथे मिरज, तासगाव वगळता अन्य सहा मतदारसंघांत बहुतेक उमेदवार शुगर लॉबीशी संबंधित आहेत. साखर कारखान्यांचे सात अध्यक्ष आहेत. त्यात भाजपचे तीन व शिवसेनेचा एक आहे. शुगर लॉबीतले भाजपकडून रिंगणात असलेले सर्व उमेदवार मूळ राष्ट्रवादीचे होते. फक्त शिवाजीराव नाईक हेच काँग्रेसकडून भाजपकडे गेले. राष्ट्रवादीच्या जयंतराव पाटलांची स्थिती आर. आर. पाटील व पतंगराव कदम यांच्या तुलनेत चांगली आहे. तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे जयंतरावांची निवडणूक एकतर्फी आहे. पलूस मतदारसंघातून पतंगराव यांची स्थिती सुरुवातीपेक्षा चांगली दिसते. येथे भाजपचे पृथ्वीराज देशमुख यांनी संघर्ष उभा केला आहे. विशेष म्हणजे जयंत पाटील यांनी पृथ्वीराजना छुप्या पद्धतीने पाठबळ दिले. येथे शिवसेना व राष्ट्रवादीचे उमेदवार चर्चेत नाहीत. ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे पतंगराव म्हणतात. जयंत, पतंगराव यांच्या तुलनेत आर. आर. आबांना तगडा मुकाबला करावा लागतोय. मोदी यांच्या तासगावच्या सभेनंतर भाजपचे उमेदवार अजितराव घोरपडे यांची स्थिती मजबूत झाली आहे. वास्तविक, येथे भाजपचे अस्तित्व नव्हते; पण लोकसभेत संजय पाटलांचा विजय व पक्षांतरानंतर उमेदवार झालेले घोरपडे यांच्यामुळे येथे भाजपला चेहरा मिळाला. आबा शुगर लॉबीतले नाहीत; पण त्यांचे समर्थक व महंकाली साखर कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरेंनी आबांच्या मागे साखरेचे बळ दिले आहे. कोल्हापूरच्या राजकारणावर साखर, दूध आणि सूत या तिन्ही सहकारी कारखानदारीचा प्रभाव राहिला आहे. आठ साखर कारखान्यांचे अध्यक्ष रिंगणात आहेत. सध्या शिवसेनेकडे दोन साखर कारखाने आहेत. भाजपकडे एकही नाही.
राज्याचे लक्ष वेधलेल्या कागल व कोल्हापूर दक्षिण या दोन्ही मतदारसंघांतले प्रमुख उमेदवार शुगर लॉबीतलेच आहेत. हसन मुश्रीफांना शिवसेनेच्या घाडगेंशी काट्याची टक्कर द्यावी लागतेय. सदाशिवराव मंडलीक व घाडगे गटांनी मुश्रीफांच्या विरोधात ताकद एकवटली आहे. जातियवादाचाही आधार त्यांच्या विरोधात घेतला जातोय. कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे बंटी पाटील व भाजपचे अमल महाडिक यांच्यात काट्याची टक्कर होते आहे. प्रचाराच्या स्पर्धेमध्ये येथे एवढी तीव्रता आहे की, शेवटच्या टप्प्यात हे दोन्ही गट बाहुबलावर उतरले तर आश्चर्य वाटू नये. या दोन्ही चुरशीच्या लढतीवर पैशांचा प्रभाव जबरदस्त आहे. साखर उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्रात पहिल्या वा दुस-या क्रमांकावर असलेल्या सोलापूर जिल्ह्याच्या निवडणुकीवरही शुगर लॉबीचा प्रभाव मोठा दिसतो आहे. अकरापैकी करमाळा, माढा, पंढरपूर, बार्शी, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या सहा मतदारसंघांत साखर कारखान्यांचे अध्यक्ष रिंगणामध्ये आहेत. दक्षिण सोलापूर वगळता अन्य पाच ठिकाणी कोणी जरी निवडून आले तरी तो साखर कारखान्याचा अध्यक्षच असेल. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांतील प्रचारावर पैशांच्या ताकदीचा प्रभाव खूप दिसतो. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळे प्रणिती शिंदेंच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पंचरंगी लढतीत एकही उमेदवार असा नाही की ज्याच्या व्होट बँकेमध्ये कुणी भागीदार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसची येथील उमेदवारी नाममात्र आहे. निवडणूक कन्या लढत असली, तरी सुशीलकुमार यांच्यासाठी ती कमालीच्या प्रतिष्ठेची आहे. मतदारसंघात ते ठाण मांडून असून व्यूहरचनेमध्ये ते स्वत: लक्ष घालत आहेत. प्रणिती यांची लढत ही प्रामुख्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम व माजी महापौर शिवसेनेचे महेश कोठे यांच्याशी आहे.