आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या ‘स्मार्ट सिटी’वर सेनेचा बहिष्कार, कार्यक्रमावर भाजपचीच छाप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वांकाक्षी ‘स्मार्ट सिटीज मिशन’च्या वर्षपूर्ती कार्यक्रमावर मित्रपक्ष शिवसेनेने बहिष्कार टाकला. काँग्रेसनेही काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. पुण्याचे महापौर राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप कार्यक्रमाला उपस्थित राहिले; मात्र राष्ट्रवादीचे इतर कोणतेही पदाधिकारी कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. मनसेही या सोहळ्याकडे न फिरकल्याने संपूर्ण कार्यक्रमावर भाजपचीच छाप राहिली.

स्मार्ट सिटीज मिशनचा पुण्यातील कार्यक्रम प्रारंभीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. निमंत्रण पत्रिकेत महापौरांचे नाव नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. मात्र, ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी संवाद साधून महापौरांचे नाव अनवधानाने वगळल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः महापौरांशीही संवाद साधला. त्यानंतर महापौरांनी सोहळ्याला हजर झाले.

पुण्याचे प्रथम नागरिक म्हणून महापौरांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते. तसेच पंतप्रधान मोदी यांचे पुणेरी पगडी आणि शिवप्रतिमा देऊन स्वागत करण्याचा मानदेखील महापौरांना देण्यात आला. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या घोषणेच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपने भपकेबाज कार्यक्रम आयोजित केला. त्यावरील कोट्यवधी रुपयांच्या खर्चाला विरोध असल्याचे सांगत शिवसेनेने बहिष्कार टाकला. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कोणत्याच कामाची पूर्तता नसताना पंतप्रधान कशाचे उद््घाटन करणार, असा प्रश्न शिवसेना शहराध्यक्ष विनायक निम्हण यांनी उपस्थित केला. पुणेकरांची दिशाभूल करण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी मोजक्या कार्यकर्त्यांसह कार्यक्रमस्थळी काळे झेंडे फडकावले. त्याचा कार्यक्रमावर परिणाम झाला नाही.

काय झालं जगताप ?
स्मार्ट सिटीज मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी देशातील शहरांमध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. यात पुण्याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. याचा संदर्भ घेत पंतप्रधान मोदी यांनी महापौर प्रशांत जगताप यांच्याकडे पाहत मराठीतून विचारणा केली, ‘काय जगताप, काय झालं? दीड मार्क कुठे गेला?’ यावर एकच हशा पिकला. ‘पुढच्या वेळी पुण्याने आणखी तयारी करत देशात पहिला क्रमांक पटकावा. इतर शहरांनीही पुण्याला मागे टाकण्याचा प्रयत्न करावा,’ असे मोदी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...