आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shiv Sena Threatens To Disrupt Asaduddin Owaisi Visit

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात ओवेसींविरोधात शिवसेनेची निदर्शने, कार्यकर्त्यांची धरपकड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मुस्लिम आरक्षण परिषदेच्या निमित्ताने पुण्यात आलेले ‘एमआयएम’ पक्षाचे नेते व खासदार असदुद्दीन ओवेसी यांची सभा उधळून लावण्याचे शिवसैनिकांचे प्रयत्न बुधवारी अयशस्वी ठरले. शिवसेनेच्या सुमारे ४०० ते ५०० कार्यकर्त्यांनी एनआयबीएम रस्त्यावरील ज्योती चौकात ओवेसींविरोधात तीव्र निदर्शने व जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी सदर आंदोलकांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, शिवसेनेने आधीच आंदोलनाची घोषणा केल्यामुळे शहराच्या काही भागातून आंदोलन होण्यापूर्वीच अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख माजी आमदार विनायक निम्हण, शिवसेना नेते अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ज्योती चौकात आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात हे नेते आंदोलनस्थळी आलेच नाही. एनआयबीएम रस्त्यावर शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली ओवेसींविरोधात आंदोलन करण्यात आले.

पोलिसांनी तातडीने बाबर यांना ताब्यात घेऊन त्यांना घटनास्थळावरून हलवले. मात्र, थोड्याच वेळात भगवे झेंडे, रुमाल घेऊन शेकडो शिवसैनिक तसेच शिवसेनेचे पदाधिकारी श्याम देशपांडे, अजय भोसले, अशोक हरणावळ, सचिन तावरे यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरात मोठा फौजफाटा तैनात केल्यामुळे आंदोलकांना नियंत्रणात ठेवणे शक्य झाले. मात्र या
आंदोलनामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

मुस्लिमांना विरोध नाही
शिवसेनेचे पदाधिकारी श्याम देशपांडे म्हणाले, ‘ओवेसी भडकाऊ भाषण करून धर्माच्या नावाखाली मुस्लिम तरुणांना भडकवत आहेत. आमचा विरोध मुस्लिमांना नसून ओवेसींना आहे. ओवेसींनी हिंदू धर्माविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास शिवसैनिक त्यास चोख प्रत्युत्तर देतील.’

शिवसैनिक नजरकैदेत
शिवसेनेच्या आंदोलनामुळे पुणे शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून बुधवारी दुपारपासूनच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. सुमारे ३५० ते ४०० शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवण्यात आले. त्यामुळे ते आंदोलन स्थळापर्यंत पोहोचू शकलेच नाहीत.

मुस्लिम आरक्षणासाठी प्रयत्न : मुख्यमंत्री
मुस्लिमांना आरक्षण देण्यास फडणवीस सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप ओवेसी यांनी सभेत केला. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘मुस्लिम समाजाकडे आम्ही कधीच व्होटबॅंक म्हणून पाहात नाही. राज्यातील मुस्लिम समाजासाठी आमचेही सरकार काही योजना तयार करत आहे. या समाजाच्या आरक्षणाबाबत अ‍ॅडव्होकेट जनरल यांनी मांडलेले मत व न्यायालयाचा निर्णय आम्ही पुन्हा तपासून पाहात आहोत. या समाजाला आरक्षण मिळण्यासाठी योग्य तो निर्णय घेऊ. आमचे सरकार कोणालाही विकासापासून वंचित ठेवणार नाही’ असे आश्वासन त्यांनी दिले.