आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेच्या ‘आव्वाजा'ने पुण्यातली ओवेसींची सभा अडचणीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शिवसेनेसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या जोरदार विरोधामुळे मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमिनचे (एमआयएम) खासदार असदुद्दीन ओवेसी यांची पुण्यातली सभा अडचणीत सापडली आहे. मुस्लिम आरक्षणासंदर्भात ४ फेब्रुवारीला आयोजित सभेत ओवेसी प्रमुख वक्ते आहेत. सभेच्या प्रसिद्धिपत्रकांमध्ये ओवेसींचे छायाचित्र ठळकपणे छापल्यानंतर या कार्यक्रमाला हिंदुत्ववाद्यांनी तीव्र विरोध सुरू केला आहे. दरम्यान, सभा रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

शिवसेनेचे शहरप्रमुख, माजी आमदार विनायक निम्हण यांनी ओवेसी यांच्या सभा झाल्यास होणार्‍या परिणामांना पोलिस जबाबदार असतील, असा इशारा दिला होता. हिंदू जनजागृती, समस्त हिंदू आघाडी, शिव प्रतिष्ठान, राजे शिवराय प्रतिष्ठान, देश बचाओ आंदोलन आदी अनेक संघटनांनीही ओवेसी यांच्या सभेला परवानगी न देण्याची मागणी पोलिसांकडे केली. वाढत्या विरोधानंतर गोळीबार मैदानातल्या जाहीर सभेला परवानगी नाकारण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. मूलनिवासी मुस्लिम मंच आणि अ‍ॅक्शन कमिटी महाराष्ट्र या दोन संघटना ओवेसी यांच्या सभेच्या मुख्य आयोजक आहेत.

आयोजकांनी सोमवारी तातडीने पत्रकार परिषद घेत खुलासा केला. "नियोजित सभा एमआयएमची नसून मुस्लिम आरक्षणाबद्दलची आहे. सभेतून कोणाचे मन दुखावण्याचा प्रश्न येत नाही. उलट विरोधकांनी खुशाल सभेत येऊन पूर्ण कार्यक्रम ऐकावा. आम्ही त्यांचे स्वागत करू,’ असे आवाहन मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी केले. शिवसेनेच्या निम्हण यांनी मात्र ओवेसींची पार्श्वभूमी पाहता सभेला विरोध कायम असल्याचे सांगितले. हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणार असतील तर शिवसेना सहन करणार नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेनेही एका पत्रकाद्वारे या सभेला विरोध केला आहे.

नागपुरात २८ ला सभा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात ओवेसी यांची २८ फेब्रुवारी रोजी सभा होत आहे. या ठिकाणी ते विदर्भातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. नागपूर महापालिकेत एमआयएमचे ६ नगरसेवक आहेत. भाजपचा बालेकिल्ला व मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या नागपुरात बळ वाढवण्यासाठी एमआयएमने प्रयत्न सुरू केले आहेत.

आरक्षणाचा मुखवटा
"समाजात तेढ निर्माण करणार्‍या ओवेसींची सभा घेण्यासाठी मुस्लिम आरक्षणाचा मुखवटा पुढे करण्यात आलाय. सभेला सेक्युलर रूप देण्यासाठी आणखी चार संस्थांची नावे घुसडली आहेत. खरा हेतू मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओवेसींचे हिंदूविरोधी भाषण आयोजित करणेच आहे.’- मिलिंद एकबोटे, कार्याध्यक्ष, समस्त हिंदू आघाडी.

शिवसैनिक सभेला जाणार
"पुण्यातील ओवेसींच्या नियोजित सभेला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही सभा उधळून लावतील. हिंदूधर्मीयांच्या भावना दुखावणारे वक्तव्य ओवेसींकडून झाल्याने निर्माण होणार्‍या परिस्थितीस सभेचे आयोजक, वक्ते आणि पोलिस जबाबदार राहतील.’ - विनायक निम्हण, शहरप्रमुख, शिवसेना.