आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivaji Maharaj Anniversary News In Divya Marathi

शिवजयंती: दिली मोदींना साथ, तरीही गड-किल्ले मात्र भकास!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘छत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ,’ अशी साद घालत भाजपने महाराष्ट्रात मतांचा जोगवा मागितला. पूर्वीच्या आघाडी सरकारनेही पंधरा वर्षे छत्रपतींच्या नावावरच सत्ताकारण केले. प्रत्यक्षात मागील सरकारने शिवकालीन गड-किल्ल्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. नव्याने सत्तेत आलेले युती सरकार तरी या प्रश्नाकडे किती गांभीर्याने पाहणार, हा प्रश्न आहे.
शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे दरवर्षी १९ फेब्रुवारीला शासकीय शिवजयंती साजरी होते. या सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थित राहण्याचा प्रघात आहे. भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून प्रथमच या साेहळ्यासाठी येत आहेत. शिवनेरीच्या पायथ्याशी असलेली सह्याद्री गिरिभ्रमण संस्था २००७ पासून किल्ले संवर्धनासाठी सरकारी उंबरठे झिजवत आहे. संस्थेने फडणवीस सरकारशीही पत्रव्यवहार केलाय. ‘अरबी समुद्रातील स्मारकापेक्षा गड महत्त्वाचे आहेत. यंदाच्या शिवजयंती सोहळ्यात महाराष्ट्र राज्य किल्ले संवर्धन आणि विकास महामंडळ स्थापनेची घोषणा करावी,’ अशी विनंती या संस्थेने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेचे अध्यक्ष संजय खत्री यांनी ‘दिव्य मराठी'ला सांगितले, दरवर्षी शिवनेरीवर येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे. सुमारे तीन लाख लोक शिवनेरीवर येतात. मात्र, या लोकांना गडाचा इतिहास सांगणारा गाइड नाही. शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन गडावर असावे, शिवकालीन वास्तू पूर्ववत उभाराव्यात या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. केवळ शिवनेरीच नव्हे, तर महाराष्ट्रातील साडेतीनशे किल्ले ही महाराजांची स्मारके आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी महामंडळ स्थापणे गरजेचे आहे.’

गडावर विकासकामे सुरूच : बी. बी. जंगले
‘पुरातत्त्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन खात्याच्या संयुक्त प्रयत्नांमधून विकासकामे सुरू आहेत. किल्ल्याभोवती संरक्षक भिंत, वृक्षारोपण, बागांची निर्मिती, गडावरील रस्ते, दरवाजे बसवणे, जुन्या वास्तूंचे बांधकाम आदी कामे मार्गी लागली आहेत. दगडी बांधकामासाठी नेवासे, नगर येथून काळा दगड आणण्यात येतो. बांधकामात सिमेंट न वापरता चुना, गूळ, हिरडा, डिंक या पारंपरिक वस्तूंचाच वापर केला जातो,’ असे जुन्नर पुरातत्त्व विभागाचे संरक्षक सहायक बी. बी. जंगले यांनी सांगितले.

गडकोट म्हणजे खजिना
गडकोट हेच राज्य. गडकोट म्हणजे राज्याचे मूळ. गडकोट म्हणजे खजिना. गडकोट म्हणजे सैन्याचे बळ. गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी. गडकोट संरक्षणाचे कार्य धारनाजूक, परमनाजूक, गडकोट किल्ले जतन करणे ही गोष्ट सामान्य आहे असे न समजता तेथील उस्तवारी व शासन यास तिळतुल्य अंतर पडो न द्यावे.’
सरकारने ‘मॉडेल फोर्ट' विकसित करावे
तीन हजार कोटी खर्चून शासनाला अरबी समुद्रात शिवस्मारक उभे करायचे आहे. आनंद आहे, पण तब्बल सहाशे किल्ल्यांच्या रूपाने शिवरायांचा जो इतिहास जिवंत आहे त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सहाशे किल्ल्यांची दुरुस्ती लगेच करता येणार नाही हे मलाही समजते; पण सुरुवातीला शासनाने रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, पन्हाळा आणि पुरंदर हे सहा किल्ले मॉडेल फोर्ट म्हणून विकसित केले पाहिजेत. केवळ मुख्यमंत्री येतात म्हणून फक्त शिवनेरीवरच लक्ष द्यायचे आणि बाकीच्या किल्ल्यांकडे दुर्लक्ष करायचे हे योग्य नाही. पुरातत्त्व खात्याकडे पुरेसा निधी नसेल तर त्यांना निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच आहे. मात्र, सरकारला तेही जमत नसेल तर तसे सांगावे. लोकवर्गणीतून गड संवर्धनाचे काम आम्ही हाती घेऊ. या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी बोललोय. त्यांनी यादृष्टीने पावले उचलण्याचे आश्वासन मला दिले अाहे.’
संभाजीराजे छत्रपती, कोल्हापूर

शिवनेरीचा लांबलेला विकास
2002
शिवनेरी परिसर विकासांतर्गत पहिल्यांदाच काम सुरू झाले. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी १० लाखांची तरतूद केली.
2003
शिवनेरी विकासासाठी ८९ कोटींच्या आराखड्यास सरकारने मंजुरी दिली.
2015
तेरा वर्षांनंतरही शिवनेरी परिसर विकास कार्यक्रम अद्याप अपूर्ण.