आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivaji Maharaj Birith Anniversary Photo Controversion In PMC, Latest News,

जयंती शिवरायांची;चित्र संभाजीराजांचे! पुणे मनपाच्या ‘प्रतापा’मुळे शिवभक्तांमध्ये नाराजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात पुणे महापालिकेने शिवरायांऐवजी संभाजीराजांचे छायाचित्र लावल्याने बुधवारी एकच गोंधळ उडाला. महापौर चंचला कोद्रे यांनी दिलगिरी व्यक्त करत महापालिकेच्या भोंगळपणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र महापालिकेच्या ‘प्रतापा’मुळे शिवभक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली.
शिवजयंतीनिमित्त महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर स्वागत कक्षाची उभारणी करण्यात आली होती. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होणार होते. या कक्षामध्ये संभाजीराजांच्या चित्राचे मोठे बॅनर ‘शिवाजीराजे’ समजून लावण्यात आले. महापालिका प्रशासनातल्या कोणत्याच अधिकार्‍याला ही चूक समजली नाही. परंतु, रस्त्यावरून जाणार्‍या-येणार्‍या पुणेकरांमध्ये या छायाचित्रावरून कुजबुज सुरू झाली. काही शिवप्रेमींनी याबद्दल आक्षेप घेतल्यानंतर महापालिकेला घडल्या प्रकारातले गांभीर्य लक्षात आले. त्यानंतर दुपारी एक वाजता संभाजीराजांचे चित्र काढण्यात आले.
दरम्यान, या गंभीर चुकीसाठी सायंकाळी उशिरापर्यंत जबाबदार दोषी अधिकार्‍यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. संबंधित अधिकारी मोबाइल फोन बंद ठेवून संपर्क टाळत राहिले. यामुळे महापौर चंचला कोद्रे यांना शिवप्रेमींच्या रोषाचा सामना करावा लागला.
पूर्वकल्पनाच दिली नव्हती : महापौर
‘संबंधित अधिकार्‍यांनी चित्रासंदर्भातली पूर्वकल्पना महापालिकेच्या पदाधिकार्‍यांना दिली नव्हती. झाला प्रकार नजरचुकीने घडला आहे. याबद्दल दिलगिरी व्यक्त करते,’ अशी प्रतिक्रिया महापौर चंचला कोद्रे यांनी दिली. पुणे महापालिकेत कॉँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असून महापौरपद ‘राष्ट्रवादी’कडे आहे.