आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी हा दत्तक पुत्रांचा पक्ष- शिवसेना नेत्याची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राष्ट्रवादी हा दत्तक पुत्रांचा पक्ष आहे. कारण शिवसेनेत तयार झालेला प्रत्येक कार्यकर्ता हा राष्ट्रवादी दत्तक घेते व पक्ष चालवते अशी टीका भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांनी आकुर्डी येथील भारतीय कामगार सेनेच्या मेळाव्यात केली. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठ्या जागा मिळतील. देशातही एनडीएलाच बहुमत मिळणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असून नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार असा विश्वासही महाडिक यांनी व्यक्त केला.
मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आलेल्या महाडिक यांनी कामगारांचा मेळावा घेतला. यावेळी शिवसेनेचे उपनेते शशिकांत सुतार, उपजिल्हाप्रमुख भगवान वाल्हेकर, बाबासाहेब धुमाळ, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक यांसह अनेक कामगार उपस्थित होते.
महाडिक म्हणाले, भारत हा शेतकरी आणि कामगारांचा देश आहे. देशात निवडून येणा-या उमेदवारांना 80 टक्के मतदान हे कामगार व शेतकरी करतात तर उर्वरित 20 टक्के मतदान हे बाकी जनता करत असते. सध्याची परिस्थिती पाहिली तर कंपन्या बंद होत आहेत, शेतकरी आत्महत्या करीत आहेत. कारण देशात असणारी युपीए सरकारची सत्ता. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक ही परिवर्तनाची निवडणूक आहे. योग्य अशा उमेदवाराला निवडून देण्याची हीच वेळ आहे. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये भगवा फडकत आहे. कारण कामगारांचे प्रश्न सोडविणारा शिवसेना हा एकच पक्ष असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील सर्वांत सक्रीय सेना म्हणून ओळखली जाते. त्यामुळे महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून देण्याची जबाबदारी प्रत्येक कामगाराने घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेत तयार झालेला प्रत्येक कार्यकर्ता हा राष्ट्रवादी दत्तक घेते व पक्ष चालवत असल्याची टीका त्यांनी अजित पवारांवर केली. नक्कल करायलाही अक्कल लागते अशा शब्दांत राज ठाकरेंवरही महाडिक यांनी टीका केली. राज ठाकरेंची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सेटिंग असल्याचाही त्यांनी आरोप केला. महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी कामगारांना केले.