पुणे- देशभरातील हजारो गुंतवणूकदारांची 22 हजार 500 कोटी रूपयांची फसवणूक केल्याने व सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याने उद्योगपती सुब्रतो रॉय यांच्या नावाने असलेल्या स्टेडियमला शिवसैनिकांनी काळे फासले. पुण्याजवळील गहुंजेजवळ रॉय यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम आहे. पिंपरी-चिंचवड व मावळ परिसरातील शिवसैनिकांनी खासगी सुरक्षारक्षक व श्वानपथकाचा खडा पहारा भेदून रॉय यांचे नाव असलेल्या फलकावर काळे फासत आंदोलन केले. तसेच या स्टेडियमला रॉय यांचे नाव काढून संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन दोन तासांनी सोडून दिले.
सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांनी देशातील हजारो गुंतवणूकदारांकडून 22 हजार 500 कोटी रूपये गोळा करून पैशांचा अपहार केल्याचा ठपका सेबीने ठेवला आहे. गुंतवणूकदारांनी सेबीकडे रॉय यांच्या कंपनीविरोधात तक्रार दाखल केल्या होत्या. याप्रकरणी कोर्टानेही रॉय यांना हजर होण्यास सांगितले होते. मात्र रॉय यांनी कोर्टाचे आदेश धुडकावून लावले. त्यामुळे सुब्रतो रॉय यांनी न्यायालयाचा अवमान केल्याने शिवसेनेने हे आंदोलन केले. जिल्हा उपप्रमुख भारत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर आंदोलकांनी धडक दिली. तसेच गेटमधून आत जात सुब्रतो रॉय यांच्या नावाला काळे फासले. त्यावेळी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या.
स्टेडियमला संत तुकाराम महाराजांचे नाव द्या- सुब्रतो रॉय सहाराडा स्टेडियमवर आंदोलन करणारे शिवसेनेचे भारत ठाकूर म्हणाले की, या स्टेडियमला संत तुकाराम महाराज यांचे नाव द्यावे. रॉय यांनी 120 कोटींचा करार करून आपले नाव दिले आहे. मात्र ज्या भूमित स्टेडियम उभारले आहे तेथेच जगतगुरु संत तुकडोजी महाराजांचा जन्म झाला आहे. त्यामुळे संत तुकाराम महाराजांचे नाव या स्टेडियमला देण्यात यावे.