आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Mp Bhausaheb Wakchaure Joins In Congress

खासदार वाकचौरेंचा सुशीलकुमार शिंदेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - शिवसेनेचे शिर्डीतील खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत आज काँग्रेसमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केला. यावेळी नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी वाकचौरे यांच्या विरोधात घोषणा देत निषेध केला. शिवसैनिक राडा करण्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांनी वेळीच दखल घेत शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तरीही शिवसैनिकांनी वाकचौरे यांचा पुतळा जाळून निषेध केला, तर कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत पुतळा दहन करणार्‍यांचा निषेध नोंदवला आहे.
‘पुतळे जाळणे बंद करा अन्यथा ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी होतील,' असा इशाराही काँग्रेसचे शिर्डीचे नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कॉँग्रेसशी जवळीक साधलेल्या वाकचौरे यांनी मागील आठवड्यात मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंची भेट घेतली होती. मात्र त्या वेळी संसद अधिवेशन सुरू असल्यामुळे तांत्रिक अडचण उद्भवू नये म्हणून प्रवेश पुढे ढकलला होता.
दरम्यान, वाघचौरेंच्या निषेधार्थ शनिवारी शिवसैनिकांनी शिर्डीत त्यांचा पुतळा जाळला होता. पक्षाशी गद्दारी करणार्‍यांना धडा शिकवू, असा इशाराही शिवसैनिकांनी दिला होता. त्याचे पडसाद काल आणि आज उमटले. वाकचौरेंच्या सर्मथनार्थ कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी नगर-मनमाड मार्गावर रास्ता रोको करत शिवसेनेचा निषेध केला. त्यामुळे दोन्ही पक्षात आगामी काळात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची चिन्हे आहेत.