आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Party Chief Uddhav Thackeray Attack On Ncp & Congress At Pune

पवारांचे लवासा अधिकृत होते मग गरीबांची घरे का नाहीत? उद्धव ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- काँग्रेस, राष्ट्रवादीवाल्यांनी सत्ता भोग भोग भोगली. त्यातून स्वतःच्या घरावर सोन्याची कौले बसविली. आता गोरगरीबांच्या घरांवर नांगर फिरवायला निघाले आहेत. मात्र, शिवसेना त्यांच्या पाठिशी आहे. त्यामुळे गोरगरीबांची घरे पाडाल तर याद राखा, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी रात्री सांगवी येथे दिला. लवासा अधिकृत होत असेल तर सर्वसामान्यांची घरे का नाहीत, असा सवालही त्यांनी केला.
मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार आप्पा उर्फ श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ सांगवी येथील पीडब्ल्युडी मैदानावर आयोजित सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. सुमारे अर्धातासाच्या भाषणात त्यांनी काँग्रेस आघाडी सरकारचा खरपूस समाचार घेतला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, पुण्यातून निवडून येणारे मंत्री-संत्री लावासाचा प्रश्न तातडीने सोडवितात. राज्य व केंद्रात सत्ता असल्याने वशिलेबाजी करत लवासा अधिकृत करतात. केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी विरोध केल्यावर त्यांची उचलबांगडी होते. हा सर्व खटाटोप लवासासाठी होतो. तर कष्टाची पै-पै करुन उभारलेली पिंपरी-चिंचवडमधील कामगारांची घरे नियमित का होत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. पिंपरी-चिंचवडमधून आमदार, खासदार द्या हा प्रश्न आम्हीच धसास लावू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. अनधिकृत घरांवर कारवाई टाळायची असेल तर घरांचे नामकरण 'लवासा' करा, अशी खोचक टीपण्णीही त्यांनी केली.
महागाई, भ्रष्टाचारामुळे देशातील सर्वसामान्य चिडलेले आहेत. त्याला नाकर्ते काँग्रेस आघाडी सरकार जबाबदार आहेत. काँग्रेसच्या करंट्या सरकारने उद्योगपतींवर देश सोडून जाण्याची वेळ आणली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निवडणुकीचे गांभिर्यही घालवून टाकले आहे. काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सगळ्यांना बदल हवा आहे. त्यामुळे सत्तापरिवर्तन अटळ आहे. तुमचे नशीब बदलायचे असेल तर मजबुत सरकार द्या. अन्यथा देशात अराजकता माजेल, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली. शरद पवार, सोनिया गांधी आमच्यावर हिंदुत्ववादाची टीका करतात. ते काही बोलले तरी त्यांचे मत धर्मनिरपेक्षवादी असते. मतांसाठी सोनिया गांधी इमाम बुखारींना भेटतात. त्यांच्याकडे मतांचा जोगवा मागतात. ओवैसी बोलल्यावर त्यांच्या तोंडाला खुंटी बसते. मात्र, आम्ही हिंदु अथवा हिंदुत्व असा विषय बोललो तरी आम्ही जातीयवादी ठरतो. आम्हाला हिंदुत्वाचा वारसा आहे. त्यामुळे हिंदुत्वाविषयी बोललो तर वावगे काय, असा सवालही त्यांनी केला. मराठी माणसांवर झालेला अन्याय आपण कदापी सहन करणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
शिवसेनेत तिकीट विकली जात असल्याच्या खासदार गजानन बाबर यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, मागील लोकसभेलाच श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, नवीन मतदार संघ असल्याने आपण त्यांना थांबायला सांगितले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी शिवसैनिकांचे मोठे वैभव आपल्याला दिले आहे. हे वैभव आपल्यासाठी रुपयांपेक्षाही बहुमोल आहे. शिवसेनेने पैसे घेवून एक जरी उमेदवारी दिली असेल तर शिवसेनेचे पक्षप्रमुखपद सोडून घरी बसेन, असा आव्हान त्यांनी दिले. ते पुढे म्हणाले, आपण जिथे जातोय तेथे ओसांडून गर्दी होत आहे. नांदेडमध्ये आपण सभेला गेलो असताना शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सभेसाठी येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या सभेला मैदान पुरणार नाही, असे आपल्याला वाटले. मात्र सभेला 'ओव्हरटाईम' देवून माणसे आणण्यात आली होती. ती देखील गल्लीबोळात सभा झाली होती, हे गुपित आपल्याला नंतर समजले. शिवसेनेला पैसे देवून सभेला माणसे आणण्याची गरज भासत नाही. शिवसैनिक हेच शिवसेनेचे वैभव आहे. हे वैभव पवार-गांधी घराण्याकडे नाही. ही श्रीमंती पैशाने मोजता येणार नाही. आमच्या सभेला माणसे मनापासून नव्हे तर 'दिल'से येतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
पुढे आणखी वाचा, उद्धव यांचा घाणाघात...