आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ahead Of Owaisi Visit, Shiv Sena Says Won\'t Tolerate Any Anti Hindu Comment

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे: शिवसेनेच्या धमकीनंतर मुस्लिम आरक्षण परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- येत्या बुधवारी( 4 तारीख) पुण्यात होऊ घातलेल्या मुस्लिम आरक्षण परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. या आरक्षण परिषदेला एमआयएमचे खासदार असावुद्दीन ओवेसी हे हजर राहणार होते. ओवेसी हे धार्मिक व वादग्रस्त वक्तव्य करण्यास पटाईत असल्याने शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी ओवेसींच्या भाषणाला व सभेला विरोध केला होता. तसेच या सभेत हिंदूंविरोधात अपशब्द काढल्यास सभा उधळून लावण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
विनायक निम्हण यांनी याबाबत पुणे पोलिस आयुक्तांना पत्र लिहून ओेवेसींच्या सभेला परवानगी देऊ नये. तसेच सभेला परवानगी दिल्यास हिंदुविरोधी वक्तव्य केल्यास आम्ही सहन करणार नाही. तसेच होणा-या अनर्थाला पोलिस जबाबदार असतील असे पत्र लिहले होते. त्यामुळे पुणे पोलिसांची धांदड उडाली होती. दरम्यान, हिंदुविरोधी वक्तव्ये केल्यास ती सहन करू नका असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका बैठकीत पक्षाच्या पदाधिका-यांना दिले असल्याचे समजते. त्यामुळे शिवसैनिकांना आता चेव चढला आहे. मुस्लिम आरक्षण हा आमचा हक्क असताना राज्य सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप खासदार असाउद्दीन ओवेसी यांनी दोन दिवसापूर्वी केला होता.

भाजपशासित कर्नाटकात मुस्लिमांना आरक्षण आहे. मात्र, महाराष्ट्रात का नाही असा सवाल करीत मुस्लिम आरक्षणासंदर्भातील अध्यादेश मंजूर करण्यासाठी आपण अधिवेशन बोलवण्याची मागणी करणार असल्याचे ओवेसींनी सांगितले होते. काही दिवसांपूर्वी सरकारने मराठा समजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा आघाडी सरकारचा निर्णय कायम ठेवला. मात्र, मुस्लिम समाजासाठी जाहीर केलेल्या टक्के आरक्षणाबद्दल कोणतीची भूमिका घेतली नाही. अखेर या अध्यादेशाची मुदत संपल्यामुळे मुस्लिमांसाठीचे आरक्षण आपोआप रद्द झाले होते. मात्र, हे आरक्षण मुस्लिम समाजाचा हक्क असल्याचा दावा ओवेसी यांनी केला आहे. त्यामुळेच मुस्लिम आरक्षण मागणीसाठी पुण्यात आरक्षण परिषद होत आहे. बुधवारी पुण्यातील गोळीबार मैदानात याचे आयोजन केले आहे.
उद्धव ठाकरेंनी घेतली आक्रमक भूमिका- बुधवारी पुण्यात होणाऱ्या एमआयएमच्या सभेवरुन उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यातील या सभेत हिंदूंविरोधात अपशब्द काढल्यास सभा उधळून लावा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसेना नेत्यांना एका बैठकीत दिल्याचे समजते आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत दोन आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या एमआयएमने महाराष्ट्रातील राजकारणात आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: मराठवाड्यात एमआयएमने ब-यापैकी लक्ष केंद्रित केले आहे. एमआयएमने आता आपला मोर्चा पुण्याकडे वळल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे.
ओवेसींची सभा नाही- दरम्यान, हा कार्यक्रम एमआयएम किंवा असाऊद्दीन ओवेसी यांचा नसून, मुस्लिम आरक्षण परिषदेने आयोजित केला आहे असे आयोजक इनामदार यांनी म्हटले आहे. राज्यातील मुस्लिम समाज आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे त्यांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात ओवेसींचा काहीही संबंध नाही. या व्यासपीठावरून कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात बोलण्याचा प्रश्नच येत नाही. उलट ज्यांनी विरोध केला आहे त्यांना आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विनंती करू असे इनामदार यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमाला माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील, मानव कांबळे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.