आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिस्तबद्ध व डोळ्यांचे पारणे फेडणारा ‘घोष’, भव्यदिव्य अन् डिजिटल ‘शिवशक्ती संगम’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवशक्ती संगम ठिकाण, मारूंजी, पुणे- शिवशक्ती संगमातील एक प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे घोष प्रात्यक्षिक. संगमस्थळी 1500 स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध ‘घोष प्रात्यक्षिक’पाहणे हा सर्वांसाठी डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा ठरला. अनक, वंशी, श्रुंग, शंख आणि पणव यांच्या तालावर आणि घोषदंडाच्या इशाऱ्यावर शिस्तबद्ध आणि दिमाखदार ‘घोष प्रात्यक्षिक’ झाले. संघ शिबिरांत नेहमीच शारीरिक प्रात्यक्षिके आणि घोष प्रात्यक्षिक होते. मात्र शिवशक्ती संगमाचा कालावधी काही तासांचाच असल्याने फक्त ‘घोष प्रात्यक्षिक’च घेतले गेले. 1500 स्वयंसेवक, सर्व वेगवेगळ्या वयोगटातले, सर्व एकाच वेळी न चुकता प्रात्यक्षिक केले. यावेळी अगदी अगदी छोट्या छोट्यासुद्धा चुका होऊ नयेत आणि ठराविक वेळेतच ते पूर्ण व्हावे याची काळजी प्रत्येक स्वयंसेवक घेत होता. संगमस्थळी घोष प्रात्यक्षिकाच्या विविध अशा 12 रचना तयार करण्यात आल्या होत्या. वेगवेगळ्या चालींवर ही प्रात्यक्षिक झाली. त्यात तिलकमोद रचनेतील शेवटचे चरण आणि हंसप्रचोदयात रचनेवर होणारे शंख आणि श्रुंग यांचे प्रात्यक्षिक विशेष ठरले.
भव्यदिव्य अन् डिजिटल ‘शिवशक्ती संगम’
रविवारी पार पडलेला ‘शिवशक्ती संगम’ हा कार्यक्रम अतिशय भव्यदिव्य अशा स्वरुपाचा होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी शुध्द पिण्याच्या पाण्याचे 15 हजार जार पुरवण्यात आले होते. हा विश्वविक्रम ठरला असून त्याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्डस मध्ये करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे व्यासपीठ हे 200 फूट लांब, 100 फुट रुंद आणि 80 फुट उंचीचे होते.
व्यासपीठावर पोहोचण्यासाठी लिफ्टची सुविधा करण्यात आली होती. व्यासपीठाची पार्श्वभूमी 250 फूट लांब आणि 100 फुट रुंद अशा प्रचंड आकाराच्या तोरणा किल्ल्याच्या छायाचित्राने सुशोभित करण्यात आली होती. व्यासपीठावर रायगडावरील राजसभा आणि मेघडंबरीची प्रतिकृती उभारण्यात आली होती. मूळ मेघडंबरीपेक्षा आकाराने तिप्पट मोठ्या असलेल्या या मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांची 18 फुटांची प्रतिमा लावण्यात आली होती. मैदानावरील ध्वजस्तंभाची उंची 70 फुट म्हणजे सात मजली इमारतीएवढी होती. कार्यक्रमस्थळास 13 भव्य प्रवेशद्वारे होती, प्रत्येक प्रवेशद्वार म्हणजे विविध गडांच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती होती.
एक लाखाहून अधिक स्वयंसेवक आणि पन्नास हजारपेक्षा जास्त नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या मंडपाचे एकूण क्षेत्रफळ दोन लाख पन्नास हजार चौरस फुट एवढे होते. मैदानावर आखणी करण्यासाठी साठ टन चुन्याची फक्की वापरण्यात आली होती, संपूर्ण आखणीची लांबी एकूण 70 किलोमीटर एवढी झाली होती.
पुण्यातील आणि परगावाहून आलेल्या स्वयंसेवकांसाठी 43 सिद्धता (तयारी) केंद्रांची सोय करण्यात आली होती. कार्यक्रमानंतर परत जाणाऱ्या परगावच्या स्वयंसेवकांना 80 हजार जेवणाची पाकिटे- शिदोरी सोबत देण्यात आली. कार्यक्रमासाठी डिजिटल तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता.
कार्यक्रमासाठीची नावनोंदणी ऑंनलाईन पद्धतीने करण्यात आली होती. कार्यक्रमस्थळी स्वयंसेवकांच्या नोंदणीसाठी बारकोड पद्धतीचा वापर करण्यात आला. कार्यक्रमस्थळी संघकार्याची माहिती देणारी ‘डिजिटल प्रदर्शनी’ लावण्यात आली होती. कार्यक्रम सर्वाना व्यवस्थित पाहता यावा यासाठी एल.इ.डी. स्क्रीन्स लावण्यात आल्या होत्या.
‘पर्यावरणस्नेही’शिवशक्ती संगम!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे मारुंजी येथे आयोजित करण्यात आलेला ‘शिवशक्ती संगम’ हा कार्यक्रम रविवारी पार पडला. कार्यक्रम हा जास्तीतजास्त पर्यावरणस्नेही असण्यावर भर देण्यात आला होता. कार्यक्रमात उपस्थित सुमारे दीड लाख स्वयंसेवकांच्या जेवणासाठी खास सुपारीच्या झाडाच्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळी आणि द्रोण वापरण्यात आले. या पत्रावळीची संख्या एक लाख तीस हजार एवढी होती. पिण्याच्या पाण्यासाठी स्टीलचे पेले वापरले. जेणेकरून प्लास्टिकच्या पत्रावळी आणि पेले यामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची समस्या निर्माण झाली नाही. खरकट्या पत्रावळी आणि उरलेल्या अन्नापासून खत बनवण्यात येणार आहे. सुमारे 450 एकराच्या परिसरात कार्यक्रमासाठी एकही झाड तोडण्यात आलेले नाही. उलट स्वयंसेवकांकडून परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे. सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी शोषखड्डे तयार करण्यात आले होते.

‘सिध्द आणि दक्ष’ सिद्धता केंद्र
दीड लाख स्वयंसेवकांसाठी कार्यक्रमस्थळी 43 सिद्धता केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक सिद्धता केंद्रात दोन हजार स्वयंसेवकांची भोजन आणि अन्य व्यवस्था करण्यात आली होती. सिद्धता केंद्रात भोजन आणि अन्य सोपस्कार आटोपून स्वयंसेवक संघस्थानी पोहोचले. सिद्धता केंद्रात सर्व स्वयंसेवकांची नोंदणी डिजिटल पद्धतीने करण्यात आली. त्यासाठी प्रत्येक स्वयंसेवकांच्या परिचयपत्रकावरील बारकोड स्कॅन करण्यात आला. त्यांच्या हातावर नोंदणी झाली या अर्थाचा बंध बांधण्यात आला. सोलापूर, कोल्हापूर नाशिक, दौंड, वेल्हे, भोर आणि सांगली अशा 6 केंद्रांची एकूण 43 सिद्धता केंद्र संकल्प शिबिर स्थानावर उभारण्यात आली होती. या मध्ये स्वयंसेवकांना गणवेश खरेदीची देखील व्यवस्था करण्यात आली होती.
पुढे पाहा, शिवशक्ती संगम संबंधित छायाचित्रे...