आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉर्टसर्किटने उडवली पुणेकरांची झोप!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यात 1 ऑगस्टला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी धास्तावलेल्या पुणेकरांना शुक्रवारी पिंपरी-चिंचवड परिसरातील डांगे चौकात झालेल्या छोट्या स्फोटाने हादरवून सोडले. एका इमारतीच्या जिन्याजवळ हा स्फोटसदृश आवाज झाला आणि प्लॅस्टिक तसेच वायरचे जळालेले तुकडे विखुरले गेले. यात पियूष संतोष वाळुंज हा पाच वर्षांचा मुलगा 40 टक्के भाजला. बॉम्बशोधक पथकाच्या तपासणीनंतर तो बॉम्बस्फोट नसून वीज तारांच्या घर्षणातून शॉर्टसर्किट झाल्याचे स्पष्ट झाले.शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. हा घातपात नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
डांगे चौकात थेरगावकडे जाणार्‍या रस्त्यावरील सोनग्रा इमारतीच्या जिन्याजवळ स्फोटासारखा आवाज झाला. आवाजामुळे घाबरलेल्या लोकांनी तातडीने पोलिसांना ही माहिती दिली. बॉम्बशोधक पथकाने तपासणी सुरू केली. संपूर्ण तपासाअंती हा शॉर्ट सर्किटचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. जखमी पियूषला प्रथम चिंचवडच्या आदित्य विर्ला रुग्णालयात आणि नंतर पुण्याच्या सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.