पुणे - १९६७ पासून पंचायत ते संसद अशा अनेक निवडणुका लढवलेल्या शरद पवारांना यंदाची निवडणूक अत्यंत आव्हानात्मक वाटतेय. राज्यातल्या २८८ जागा लढवण्याची वेळ आल्याने आव्हान अधिक गंभीर झाल्याचे त्यांचे स्वत:चे मत आहे. ‘देशातला पॉवरफुल नेता’ अशी ओळख असलेल्या पवारांना आता चक्क प्रिंटिंग मटेरियलसारख्या साधनसामग्रीपासून राज्यभर प्रचार करू शकणा-या वक्त्यांपर्यंतची कमतरता भासते आहे. स्वत: पवारांनीच या बाबींचा उलगडा केला.
‘निवडणुकीला सामोरे जाताना १३०-१४० जागांची तयारी केली होती. दुर्दैवाने यात मर्यादा आल्या. एकदम २८८ जागा लढण्याची वेळ आली. हे आव्हान गंभीर होते. त्यासाठीची तरतूद केलेली नव्हती. तयारी नव्हती. साहजिकच एवढे आव्हान पेलताना साधनसामग्री आणि कँपेनरच्यादेखील मर्यादा येत आहेत,‘ असे खुद्द पवारांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
‘१९९९ नंतर राष्ट्रवादी पहिल्यांदाच स्वबळावर निवडणूक लढवत आहे. सुरुवातीला आघाडीचीच भूमिका होती. कॉंग्रेस अध्यक्षा
सोनिया गांधीची भूमिकाही अत्यंत सकारात्मक होती. प्रश्न स्थानिक पातळीवर होता. चर्चा सुरू असतानाच कॉंग्रेसने ११० जागांची यादीही जाहीर केली. आमच्यापुढे प्रस्तावच आला नाही आणि आघाडी तुटली’, असे पवार म्हणाले. कॉंग्रेसची वाट पाहात राहिलो असतो तर आमची फजिती झाली असती. ऐनवेळी खूप प्रयत्न करून सर्व ठिकाणी उमेदवार देण्याचा प्रयत्न केला. पण त्यात शंभर टक्के यश आले नाही, असे पवार म्हणाले. त्यांच्या स्पष्टीकरणामुळे अजित पवार यांची स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा पोकळ असल्याचे सिद्ध झाले आहे.
पवारांचा गौप्यस्फोट
दक्षिण कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात ‘राष्ट्रवादी’चा उमेदवार देऊच नये, हेच माझे मत होते. मात्र ही जागा लढण्याचा निर्णय स्थानिक नेतृत्त्वाने घेतला होता, असा खुलासा पवार यांनी केला. ‘विलासकाका उंडाळकर या कॉंग्रेस बंडखोराला ‘राष्ट्रवादी’ने पाठिंबा िदला आहे. त्यांच्या प्रचाराला जाणार का?’ यावर पवार म्हणाले, उंडाळकरांनी त्यांची पहिली निवडणूक कॉंग्रेसच्या विरोधातच जिंकली असल्याने त्यांच्याशी आमची जवळीक आहेच. मात्र मला माझ्याच उमेदवारांच्या प्रचाराला वेळ नसल्याचे त्यांच्या प्रचाराला जाऊ शकणार नाही.’
‘व्यक्तीगत टीका टाळा'
पृथ्वीराज चव्हाण आणि कॉंग्रेसकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका सुरू आहे. याबद्दल पवार म्हणाले, ‘चव्हाणांना मी सांगू शकत नाही. प्रचारादरम्यान व्यक्तिगत टीका टाळण्याचे आवाहन आमच्या सहका-यांना मी जरूर करेन. मी स्वतः व्यक्तिगत टीका करत नाही. मी कोणाची नावेसुद्धा घेत नसतो.’