पुणे- श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन झाले आहे. पुणेकरांनी भव्य दिव्य रांगोळ्यांनी पालखीचे स्वागत केले. दोन्ही पालख्यांच आज (शनिवारी) दुपारी पुण्यात आगमन झाले. यानिमित्ताने वारकरी मुक्काम करीत असणार्या ठिकाणांची, मंदिरांची रंगरंगोटी, स्वच्छता करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम असलेल्या भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असलेल्या श्री निवडुंग्या विठोबा मंदिरांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
संपूर्ण मार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महापालिकेतर्फे संपूर्ण मार्गाची साफसफाई करण्यात आली आहे. जनजागृती करणारे माहिती फलकही लावण्यात आले आहेत. वैद्यकीय तपासणी पथके, पोलिस मदत केंद्र, मंडळे आणि सामाजिक संस्थांच्या भोजनालयांची तयारीही करण्यात आली आहे.
दरम्यान, उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी वारकर्यांनी मनोभावे सेवा केली. आज शनिवार असल्याने उपासाची खिचडीसह जेवण देण्यात आले. विविध संस्था, संघटना यांनीही वारक-यांची चांगली सोय केली होती. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनेही वारक-यांसाठी आरोग्य सेवा, जेवणावळीचे आयोजन केले होते. पिंपरीतील एच ए कॉलनी येथे वारक-यांसाठी नाश्त्याची सोय करण्यात आली होती. दुपारी पुणे शहरात दिवसभर पालखी फिरल्यानंतर कसबा पेठेत मुक्कामी स्थानी जाईल. पुण्यात पालखीचे दोन मुक्काम आहेत. येथेच संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालखीचे मनोमीलन होईल व सोमवारी सकाळी दोन्ही पालख्या वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूराकडे मार्गस्थ होतील.
दरम्यान, देहूनगरीतून शुक्रवारी सकाळी तुकाराम महाराजांची मार्गस्थ झाल्यानंतर मुक्काम आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात झाला. शुक्रवारी दिवसभर आकुर्डीकरांचा पाहुणचार घेतल्यानंतर पालखी पुण्यात दाखल झाल्या आहेत.
पुढे पाहा, पुण्यनगरीत आगमन झालेल्या पालखीचे आमचे प्रतिनिधी निनाद कुलकर्णी यांनी आपल्या मोबाईल कॅमेर्यात टिपलेली क्षणचित्रे..