आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: दोन्ही पालख्यांचे पुण्यात आगमन, राज्यपाल दर्शनाविना परत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिमझिम सरी अंगावर झेलत, टाळ-मृदंगाचा घोष करत लक्षावधी वैष्णवांचा मेळा शुक्रवारी दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पुण्यनगरीत दाखल झाला. - Divya Marathi
रिमझिम सरी अंगावर झेलत, टाळ-मृदंगाचा घोष करत लक्षावधी वैष्णवांचा मेळा शुक्रवारी दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पुण्यनगरीत दाखल झाला.
पुणे - लक्षावधी वारक-यांच्या उत्साही सहभागाने पुण्याकडे प्रस्थान केलेली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी शुक्रवारी पुण्याच्या मार्गावर संगमवाडी येथे ठाण मांडून बसली. दिंडी संघटनेने आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आग्रही भूमिका घेतली. पालखी वाटेत थांबवून ठेवल्याने भाविकांच्या उत्साहावर पाणी फेरले. त्यातच दिंडी संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतल्याने पालखीच्या दर्शनासाठी खास मुंबईहून आलेल्या राज्यपालांनाही दर्शन न घेताच परतावे लागले.
आषाढी वारीदरम्यानच्या पंढरीसह सर्व मार्गांवर घाणीचे साम्राज्य पसरते हे सर्वविदित आहे. शौचालयांची व्यवस्था नसल्याने वारीनंतर हाताने मैला साफ करण्याची कूप्रथा कायम असल्याची बाब एका याचिकेद्वारे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावर न्यायालयाने ही कूप्रथा सुरू असल्याबद्दल सरकारला धारेवर धरत ती बंद करण्याचे आदेश दिले होते.
वारक-यांसाठी तात्पुरती स्वच्छतागृहे उभारण्याचे आदेशही दिले. पंढरपूरच्या वाळवंटात तंबू उभारण्यास बंदी घातली. मात्र, सरकारने यासंदर्भात आवश्यक उपाययोजना न केल्याने वारक-यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गुरुवारी प्रस्थानापूर्वीही दिंडीकरी, फडकरी मंडळींनी संघर्षाचा पवित्रा घेतला होता. मात्र, गुरुवारीच हा वाद मिटवण्यात आला. शुक्रवारी संगमवाडीजवळ पालखी आल्यावर मात्र दिंडी मालक संघटनेने आग्रही भूमिका मांडत पालखी थांबवली. सरकारने वारक-यांच्या मागण्या न्यायालयासमोर मांडाव्यात. तसे निवेदन संघटनेला द्यावे, मगच पालखी पुढे नेऊ, अशी भूमिका संघटनेने घेतल्याने गोंधळ निर्माण झाला. राज्य शासनाने मध्यस्थी करावी व तोडगा काढावा, अशी मागणी संघटनेने लावून धरली होती.
सुरक्षेबाबत प्रतिकूलता-
राज्यपाल सी. विद्यासागर राव हे दोन्ही पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी प्रथम वाकडेवाडी आणि नंतर संगमवाडीला येणार होते. त्या नियोजनानुसार शुक्रवारी दुपारी साडेबाराला पुण्याच्या राजभवनात त्यांचे आगमन झाले. त्यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याशी चर्चा केली. नियोजित कार्यक्रमानुसार साडेचारला राज्यपाल मोटारीने दर्शनासाठी निघणार होते. मात्र, त्याआधीच जिल्हाधिकारी व पाेलिसांनी दिंडी संघटनेच्या भूमिकेची माहिती देऊन सुरक्षेबाबत अनुकूल स्थिती नसल्याचा अहवाल दिला. त्यामुळे राज्यपाल मुंबईला परत गेले.
पालख्या पुण्यात विसावल्या; माउलींच्या पालखीला उशीर-
रिमझिम सरी अंगावर झेलत, टाळ-मृदंगाचा घोष करत लक्षावधी वैष्णवांचा मेळा शुक्रवारी दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पुण्यनगरीत दाखल झाला. तुकोबांची पालखी साडेपाच वाजता वाकडेवाडीमार्गे पुण्यात आली, तर दिंडी मालकांच्या भूमिकेमुळे माउलींचा पालखी सोहळा संगमवाडीला खोळंबल्याने सुमारे दोन तास उशिराने पुण्यात पोहोचला.
तुकोबांची पालखी आकुर्डीहून सकाळी अकराच्या सुमारास पुण्याच्या दिशेने निघाली आणि मधले विसावे घेत सायंकाळी पाचनंतर पुण्याच्या वेशीत प्रवेशली. पालखीच्या दर्शनासाठी पुणेकरांनी दुतर्फा गर्दी केली होती. पुणेकरांच्या वतीने महापौर दत्ता धनकवडे यांनी पालखीचे स्वागत केले. दिंडी मालक संघटनेच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर माऊलींची पालखी पुण्याच्या दिशेने निघाली.रात्री दहानंतर माउलींचा पालखी सोहळा मुक्कामी पोहोचला. आता दोन्ही पालख्यांचा दोन दिवस पुण्यातच मुक्काम राहणार आहे.
पुढे छायाचित्रांच्या माध्यमातून पाहा, दोन्ही पालख्यांची कसे स्वागत झाले त्याची क्षणचित्रे...