आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shripal Sabnis Cancel His Agitation Againest Sahitya Mahamandal

साहित्य महामंडळाने भाषण छापल्याने श्रीपाल सबनीसांचे उपोषण मागे!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मराठी साहित्य संमेलनातील आपले लिखीत अध्यक्षीय भाषण न छापल्याने उपोषण करण्याचा निर्णय संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मागे घेतला आहे. साहित्य महामंडळाने सबनीस यांच्या लिखीत भाषणाच्या 1 हजार प्रती छापल्याने आपण आपले नियोजित उपोषण मागे घेत असल्याचे सबनीस यांनी जाहीर केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात नुकत्याच पार पडलेल्या 89 व्या मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे लिखीत अध्यक्षीय भाषण साहित्य महामंडळाने छापले नव्हते. या भाषणात आक्षेपार्ह व वादग्रस्त मुद्दे मांडल्याने महामंडळाने भाषण छापण्यास दिरंगाई केल्याचे बोलले गेले. मात्र, महामंडळाने सबनीस यांचे लिखीत भाषण वेळेत आमच्याकडे पोहचले नसल्याचे सांगत वेळ मारून नेली. अखेर सबनीस यांनी स्वखर्चाने 2 हजार प्रती छापून संमेलनात वाटल्या व संमेलनादरम्यान विवेकी भूमिका घेत मार्ग काढला. मात्र, संमेलन संपताच सबनीस यांनी महामंडळावर हल्लाबोल करीत सडकून टीका केली. यानंतर संमेलनाध्यक्षाचे भाषण न छापणे हे महामंडळाची असहिष्णूता आहे व माझे भाषण वादग्रस्त आहे की नाही हे ठरविण्याचा सेन्सारशिप अधिकार महामंडळाला कोणी दिला?असा सवाल करीत तोफ डागली होती.
साहित्य महामंडळाने आपले भाषण चार दिवसात (26 जानेवारीपर्यंत) छापून न वाटल्यास आपण 27 जानेवारीपासून महामंडळाच्या कार्यालयाबाहेर सपत्निक उपोषण करू असा इशारा सबनीस यांनी दिला होता. त्यानंतर मात्र, महामंडळाने नमते घेत सबनीस यांच्या लिखीत भाषणाच्या 1 हजार प्रती छापल्या आहेत. आता त्या वेगवेगळ्या ठिकाणी वाटण्यात येणार आहेत. सबनीस यांच्या पुण्यातील घरीही महामंडळाने 25 प्रती पाठवल्या आहेत. अखेर आपले मागणीची दखल घेतल्याने सबनीस यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.