आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shripal Subnis Gone For Morning Walk After The Threat

आव्हान स्वीकारून सबनीस यांचा पुण्यात मॉर्निंग वॉक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सनातन संस्थेने दिलेल्या ‘मॉर्निंग वॉकला जा’ या आवाहनाचा स्वीकार करत नियोजित संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सोमवारी काही मीटर चालून मॉर्निंग वॉक घेतला. मात्र, प्रसिद्धीसाठीचा एक नवा मार्ग, अशा शब्दांत या वॉकविषयीची प्रतिक्रिया उमटली.

काही दिवसांपूर्वी सनातन संस्थेचे संजीव पुनाळेकर यांनी सबनीस यांना मॉर्निंग वॉकला जाण्याचा सल्ला ट्विट करून दिला होता. यापूर्वी डॉ. दाभोलकर, पानसरे तसेच कलबुर्गी यांची मॉर्निंग वॉकच्या वेळीच हत्या करण्यात आली होती. त्यामुळे हे ट्विट वादग्रस्त बनले होते. मात्र, मी धमक्यांना घाबरत नाही, असा पवित्रा सबनीस यांनी घेतला होता. त्यानंतर सबनीस यांच्या समर्थनार्थ काही संस्था आणि व्यक्तींनी सोमवारी सकाळी ‘मॉर्निंग वॉक वुईथ सबनीस’ अशी प्रभातफेरी काढली. सोशॅलिस्ट पार्टी इंडिया, आरोग्य सेना, राष्ट्रीय सेवा दल अशा काही संघटना आणि कार्यकर्ते या प्रभातफेरीत सहभागी झाले होते. रेल्वे स्थानकाजवळचा महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच्या डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत ही फेरी होती. कार्यकर्त्यांनी यावेळी सनातनचा धिक्कार असो, लोकशाही झिंदाबाद, लोकशाही की ठोकशाही, अशा घोषणाही दिल्या.

या वेळी सबनीस म्हणाले,“मी माझे विचारस्वातंत्र्य व्यक्त करत आहे. मते कुणाला पटोत, न पटोत, पण भाजपच्या मंत्री व कार्यकर्त्यांनी संमेलनाला जरूर यावे. संमेलन हे सबनीसांचे नसून मराठी भाषेचे आहे, हे लक्षात ठेवून सर्वांनी यावे. माझे पुतळे जाळा वा धिंड काढा, पण संमेलनाला याच,”.

वादच जास्त, संमेलन रद्द करा : विठ्ठल वाघ
पिंपरी चिंचवड येथील साहित्य संमेलनच रद्द करा, अशी मागणी ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी केली. ते म्हणाले, या संमेलनात साहित्यापेक्षा वादचीच चर्चा होत आहे. त्यामुळे साहित्याचा आदर राखला जात नाही. अशा वातावरणात संमेलन घेण्यापेक्षा ते रद्द केलेलेच बरे. त्यांच्या या मागणीने साहित्य वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सबनीसांनी पुढाकार घेऊन वाद मिटवावा : पाटील
पुणे - ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाविषयी, नियोजित अध्यक्षांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे निर्माण झालेला वाद, आता नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनीच पुढाकार घेऊन मिटवावा,’ असे जाहीर आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी सोमवारी केले.
पिंपरी येथे संमेलनस्थळाची पाहणी करण्यासाठी आमंत्रित पत्रकारांशी ते बोलत होते. ‘मी स्वत:च सबनीस यांना आता भेटणार आहे पंतप्रधान हे सर्वोच्च सन्मानाचे पद आहे. त्या पदावरील व्यक्तीविषयी आक्षेपार्ह विधाने करणे गैर आहे. त्या पदाचा मान त्यांना द्यायलाच हवा. त्यामुळे सबनीसांनी हा वाद मिटवावा, असे पाटील म्हणाले.

मराठीच्या उत्सवात सहभागी व्हा
संमेलनांच्या इतिहासात स्वागताध्यक्षांनी स्वत: सर्वांना वैयक्तिक भेटून निमंत्रण देणे हे प्रथमच घडत आहे. हा मराठी भाषेचा उत्सव आहे. त्यात समाजातील सर्व घटकांनी मतभेद विसरून सहभागी व्हावे व हा उत्सव साजरा करावा, म्हणून मी सर्वांना आमंत्रण दिल्याचे पाटील म्हणाले.