आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचा शुभम चौंडेकर लेफ्टनंट होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- औरंगाबादचा शुभम गणेश चौंडेकर हा अवघ्या अठरा वर्षांचा युवक भारतीय सैन्यदलात अधिकारी होणार असून त्याला प्रशिक्षणानंतर लेफ्टनंट ही कमिशन्ड रँक मिळणार आहे. शुभमची निवड टेक्निकल एन्ट्रीअंतर्गत झाली असून अखिल भारतीय गुणवत्ता यादीत त्याने 21 वा क्रमांक मिळवला आहे. जुलै 2013 पासून तो प्रशिक्षणासाठी रुजू होणार आहे.

शुभमचे शालेय शिक्षण औरंगाबादच्या महाराष्ट्र पब्लिक स्कूलमधून झाले. दहावीत त्याने 96.36 टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर देवगिरी कॉलेजमधून त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. उच्चशिक्षणासाठी तो पुण्यात व्हीआयटीमध्ये दाखल झाला.

दिव्य मराठीशी बोलताना शुभम म्हणाला, सैन्यदलात जाण्याची प्रेरणा माझ्या शाळेचे प्राचार्य मेजर (निवृत्त) जी. के. घुगे यांच्याकडून मिळाली. पहिल्या मुलाखतीत मी यशस्वी होऊ शकलो नाही, पण निराश न होता नव्याने प्रयत्न केले. पुण्याच्या अ‍ॅपेक्स करिअरचे लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रदीप ब्राह्मणकर यांच्या मार्गदर्शनामुळे मी यशस्वी होऊ शकलो. माझे वडील औरंगाबादमध्ये लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत, तर आई गृहिणी आहे. मोठी बहीण पुण्यात शिकत आहे. पुढच्या महिन्यापासून माझे गया (बिहार) येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीत प्रशिक्षण सुरू होईल. त्यानंतर चार वर्षांच्या अभियांत्रिकी प्रशिक्षणासाठी मी सीएमई (कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, किंवा सिकंदराबाद येथील मिलिटरी कॉलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा महू येथील मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन अ‍ँड इंजिनिअरिंग येथे दाखल होईन. शुभमला अभियांत्रिकी प्रशिक्षण होण्याच्या एक वर्ष आधीच लेफ्टनंट ही कमिशन्ड रँक मिळेल आणि शिक्षण पूर्ण होताच तो आर्मी युनिटमध्ये ऑफिसर म्हणून कार्यरत होईल.