पुणे - साने गुरुजींची ‘श्यामची आई’ प्रथमच ‘ऑडिओ बुक’ (श्रवणग्रंथ) स्वरूपात उपलब्ध होत आहे. पुण्याच्या ‘की नोट ऑडिओज्’तर्फे मुद्रा भागवत यांनी या श्रवणग्रंथाची निर्मिती केली आहे. लहानपणापासून साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ने मनावर गारूड केले आहे. पण आजच्या किशोरवयातील मुलांना ‘श्यामची आई’ त्यांना जवळच्या वाटणा-या माध्यमातून भेटवता येईल का, हा विचार करताना ‘ऑडिओ बुक’ची कल्पना सुचली. गुरुजींच्या पुतणी सुधाताई बोडा यांचे सहकार्य मिळाले आणि माझी कल्पना प्रत्यक्षात उतरली, असे या उपक्रमाची निर्मिती करणा-या मुद्रा भागवतने सांगितले.
श्यामची आई या चित्रपटरूपाने आचार्य अत्रे यांनी रसिकांसमोर आणला होता आणि राष्ट्रपती पुरस्कारावर नाव कोरले होते. चित्रपट पाहिल्यापासून आणि मूळ पुस्तक वाचल्यापासूनच हे केवळ कथानक वा संवाद नाहीत, हा एक संस्कार आहे, ही खात्री पटली होती. हा संस्कार पुढच्या पिढीपर्यंत नेणे, हे कर्तव्य समजून हे ऑडिओ बुक केले आहे, असे ती म्हणाली.
असे आहे ऑडिओबुक
>एकूण ४२ कथांचा समावेश
>साडेसहा तासांचे ध्वनिमुद्रण
>धीरेश जोशी आणि वासंती जोगळेकरांचे आवाज
>विभावरी जोशी यांचा स्वर
>आशुतोष कुलकर्णी व सचिन इंगळे यांचे संगीत
>गुरुजींच्या पुतणी असणा-या सुधाताई बोडा यांचे स्वगत
माध्यमही तरुणच हवीत
युवा पिढीपर्यंत हे संस्कार नेण्यासाठी माध्यमही नवं आणि तरुणच हवे. त्या भूमिकेतून ऑडिओबुकचा पर्याय स्वागतार्ह आहे. हा श्रवणग्रंथ गुरुजींच्या सात्विक लेखणीतून उतरलेला असल्याने तो संस्कारक्षम वयाच्या मुलांच्या हातात पोचावा. माधव वझे, अभिनेते व नाट्यसमीक्षक.