आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sindhuratna News In Marathi, Tarun Vijay, Parliamentary Defence Committee

‘सिंधुरत्न’वरील नौसैनिकांचे मृत्यू हे केंद्राचे पाप, संसदीय समिती अध्‍यक्ष तरूण विजय घणाघात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - सिंधुरत्न पाणबुडीवरील दुर्घटनेत गेलेला दोन नौदल अधिकार्‍यांचा बळी हे केंद्र सरकारच्या नियोजित अकार्यक्षमतेमुळे घडलेले पाप आहे. उच्चस्तरीय समितीकडून या दुर्घटनेची चौकशी केली जावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि संसदीय सीमा संरक्षण समिती अध्यक्ष खासदार तरुण विजय यांनी केली.


‘सिंधुरत्न’च्या अपघातानंतर नौदलप्रमुख अँडमिरल डी. के. जोशी यांनी राजीनामा दिला. हेच संरक्षण मंत्रालयाच्या बेजबाबदारपणाचे उदाहरण मानावे, अशी टीका विजय यांनी केली. सैन्यविरोधी दृष्टिकोन बाळगणारे सरकार सत्तेत असल्याने देशाचे संरक्षण आणि सीमेवरच्या जवानांचा जीव धोक्यात आला असल्याचे ते म्हणाले. पाणबुड्यांमधील बॅटर्‍यांच्या खरेदीमध्ये अक्षम्य दिरंगाई होत असल्याची बाब कॅगने 2008-09 मध्ये स्पष्टपणे नोंदवली. याकडे केंद्राने गांभीर्याने पाहिले नाही. पाणबुड्या, बोटी आणि शस्त्रास्त्रे जुनाट असून त्यांच्या आधुनिकीकरणाकडे सरकारचे दुर्लक्ष आहे, असा आरोप विजय यांनी केला.


नीचांकी नौदल क्षमता
देशाच्या नौदल क्षमतेविषयी अहवालातील गंभीर बाबी विजय यांनी निदर्शनास आणल्या..
> पुढच्या पाच वर्षांत भारतीय नौदल क्षमता देशाच्या इतिहासातील नीचांकी असेल. चीन आणि पाकिस्तानच्या नौदल सज्जतेच्या तुलनेत भारताची अवस्था बिकट आहे.
> सहा नव्या पाणबुड्यांच्या बांधणीचा प्रकल्प अपेक्षित वेळेपेक्षा रखडला आहे. 2016 पूर्वीत्या सेवेत दाखल होणार नाहीत.
> नौदलाने संरक्षण मंत्रालयाकडे अनेकदा सुसज्ज बोटींची मागणी केली; पण त्याकडे दुर्लक्षच झाले. 2000 नंतर एकही नवी बोट दाखल झाली नाही.


अपघात कशामुळे ?
रशियन बनावटीची आयएनएस सिंधुरत्न पाणबुडी 1988 मध्ये नौदलात दाखल झाली. या पाणबुडीवर प्रत्येकी आठशे किलो वजनाच्या 240 बॅटर्‍या होत्या. या बॅटरीचे आयुष्य चार वर्षे असते. त्यानुसार सिंधुरत्नवरील बॅटर्‍यांचे आयुष्य डिसेंबर 2012 मध्येच संपले. बॅटर्‍यांची कार्यक्षमता संपण्यापूर्वी त्या बदलण्याची नौदलप्रमुखांची मागणी दीर्घ काळापासून संरक्षण मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. या अकार्यक्षम बॅटर्‍यांमुळेच अपघात घडला, असा आरोप विजय यांनी केला.