आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा वेचणारी मुले बोलतात फाडफाड इंग्रजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कचरा वेचून पोट भरणार्‍या गयाबाईंची नात अदिती आज फाडफाड इंग्रजी बोलते. गयाबाईंना इंग्रजीच काय, हिंदीचाही गंध नाही. फक्त मराठी. अदितीला गेल्या वर्षीच शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) इंग्रजी शाळेत प्रवेश मिळाला आहे. गयाबाई आठ कुटुंब सदस्यांसोबत एका खोलीत राहतात. नातीला शाळेत घालण्यासाठी गेल्या तेव्हा सुरक्षारक्षकाने गेटमधून हाकलून दिले. गयाबाईंनी अर्चना कांबळेची मदत घेतली. प्रवेश मिळाला.
अर्चना काही वजनदार नेता नाही की तिच्या शब्दावर शाळेत प्रवेश मिळेल. अर्चनादेखील त्याच झोपडपट्टीत राहणारी सर्वसामान्य महिला. फक्त बारावीपर्यंत शिकलेली; पण तिचे वेगळेपण सिद्ध करणारी बाब म्हणजे अर्चनाला शिक्षण हक्क कायद्याची खडान् खडा माहिती आहे, त्यात गरीब मुलांना खासगी शाळेत प्रवेश मिळवून देण्याची तरतूद आहे. अर्चना झोपडपट्टीत जाऊन अर्ज भरून घेते. मुलांसोबत शाळेत जाऊन अर्ज भरते.
अर्चनाची सासू कचरा निवडते. तिनेच अर्चनाला या संस्थेबद्दल सांगितले. कागद कष्टकरी पंचायत. 8000 सदस्यांची ही पंचायत कचरा गोळा करणार्‍यांसाठी काम करते. लोकांनी लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मांडला, तेव्हा अर्चनाने ही मोहीम हाती घेतली. आरटीआयच्या आधारे आपली मोहीम बळकट केली.
लक्ष्मीनगर वस्तीत राहणार्‍या मंतशाला इंग्रजी शाळेत प्रवेश मिळाला होता, पण इतर मुलांपासून तिला दूर बसवले जात होते. विरोध केला. पालकांच्या बैठकीत कोणतेही शिक्षक तिच्या आईशी बोलत नसत. पंचायतीची सदस्य सोबत गेली तेव्हा शाळावाल्यांचे वागणे बदलले. लता गायकवाडलाही शाळेची वागणूक चांगली मिळत नव्हती. दोन नातवांसाठी ती शाळेत अर्ज घेण्यासाठी गेली तेव्हा तिला विनाकारण उत्पन्न, जात आणि जन्म प्रमाणपत्र मागितले. नंतर एकाला प्रवेश दिला व दुसर्‍याला नाकारला. दुसरा नातू तिसर्‍या इयत्तेत शिकत होता. अर्चनासाठीही आरटीआयअंतर्गत मुलांना प्रवेश मिळवून देणे सोपे नव्हते. गेल्या वर्षी कायदा लागू झाला तेव्हा शाळावाले म्हणत होते की, आम्हाला काहीच माहिती नाही. मुख्याध्यापक नाहीत, अशी कारणे दिली. काहींनी तर प्रवेश दिला; पण शुल्क भरावे लागेल, असे सांगून घाबरवले. पण अर्चना आणि त्यांच्या संस्थेने हार मानली नाही. गेल्या वर्षी पुण्यातील 47 मुलांना प्रवेश मिळाला. या वर्षी 200 अर्ज गोळा झाले आहेत.
प्रारंभी मुले मळके कपडे घालून शाळेत जात. शाळेतून अध्र्यातूनच पळून येत. वह्या-पुस्तकेही फाटलेली होती. गृहपाठ नाही ना वर्गाभ्यास. आता सर्वकाही बदलले आहे. इस्त्री केलेले स्वच्छ गणवेश आणि पॉलिश केलेले बूट. सरकारी शाळेत जाणार्‍या त्यांच्याच झोपडपट्टीतील मुलांपेक्षा ही मुले वेगळी दिसतात. आरटीआयअंतर्गत प्रवेश मिळालेली ही नशीबवान मुले आहेत.