आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Smita Gondkar Demanded 10 Crores Claims Ex Corporator

तडजोडीसाठी स्मिता गोंदकरने मागितले 10 कोटी ! माजी नगरसेवकाचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मराठी अभिनेत्री स्मिता गोंदकर हिला फसवल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला पनवेलचा माजी नगरसेवक सिद्धार्थ बांठिया याने बुधवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना गौप्यस्फोट केला. कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेले हे प्रकरण मिटवण्यासाठी स्मिताने 10 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप बांठियाने केला आहे.

बांठिया म्हणाला, स्मिता व माझी ओळख दोघांच्या एका मित्रामुळे झाली. माझे पहिले लग्न होऊन 13 वर्षे झाली असून मला दोन मुलेही आहेत. माझी पत्नीही स्मिताला ओळखते. पत्नी व माझ्यातील वादाचा गैरफायदा घेत स्मिताने माझ्याशी जवळीक केली. मी तिला वर्सोवा माझे घर काही दिवसांसाठी दिले होते. परंतु मी तिच्याकडून घर मिळवून देतो म्हणून कधीही पैसे घेतले नाहीत. एका शूटिंगदरम्यान सेटवर अभिनेता न आल्याने मी लग्नाच्या शूटिंगसाठी बसलो होतो. त्या शूटिंगच्या आधारे स्मिता माझ्याशी लग्न झाल्याचा दावा करत आहे. त्याबाबत दोन वर्षांपासून पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात दावा सुरू आहे. सदर दाव्यावेळी स्मिताने माझ्याकडे फ्लॅट मागितला व नंतर दहा कोटींची मागणी केली. दरम्यान, स्मिताची आई जानकी यांनीही सिद्धार्थवर आरोप केला. तसेच फ्लॅट देण्यासाठी आपले दागिने सिद्धार्थला दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?
पहिले लग्न झालेले असतानाही फसवणूक करत सिद्धार्थने दुसरे लग्न केले. तसेच शासकीय कोट्यातून घर मिळवून देतो म्हणून तिच्याकडून 11 लाख रुपये उकळले, असा स्मिता हिने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे.


पैशाने प्रतिष्ठा विकत घेता येणार नाही

बांठियाचे आरोप खोटे असून त्याने माझे आयुष्य बरबाद केले आहे. त्याने माझा विश्वासघात केला असला तरी मी कधीही त्याच्याकडे पैशांची मागणी केली नाही. माझी प्रतिष्ठा त्याच्या पैशाने कधी विकत घेता येणार नाही. मला त्याच्याकडून पैसे नकोत. त्याने लग्न झालेले मान्य करत घटस्फोट द्यावा.
स्मिता गोंदकर, अभिनेत्री