आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - भारतीय सैन्यदलाच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी पुण्याच्या स्नेहा बाळकृष्ण सपकाळ या 22 वर्षीय युवतीची निवड झाली आहे. मुख्य म्हणजे अखिल भारतीय गुणवत्ता यादीत स्नेहाने तिसरे स्थान पटकावत थेट लेफ्टनंट पदावर झेप घेतली आहे. चेन्नईमधील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीमध्ये ती शुक्रवारपासून (5 एप्रिल) रुजू होत आहे. 49 आठवड्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर ती भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून कार्यरत होईल. पुण्याच्या पिंपळे गुरव भागात राहणारी स्नेहा सैन्यदलाच्या एन. सी. सी. एंट्री अंतर्गत सैन्यदलात निवडली गेली आहे. स्नेहाचे वडील बाळकृष्ण सपकाळ म्हणाले, मी सैन्यदलात 17 वर्षे नोकरी केली आणि नायक रॅँकमधून निवृत्त झालो. आता माझी मुलगी देशासाठी काम करणार याचा खूप आनंद वाटतो. स्नेहाची आई उज्ज्वला या गृहिणी आहेत, तर मोठा भाऊ सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. केंद्रीय विद्यालयात शिकलेल्या स्नेहाने विज्ञान शाखेची पदवी मिळवली आहे. शालेय जीवनात तिने खो-खो, व्हॉलीबॉल, अॅथलेटिक्स व बॅडमिंटनमध्ये प्रावीण्य मिळवले आहे. स्कॉऊट्स-गाइड्सच्या नॅशनल कँपमध्येही तिचा सहभाग होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.