आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Society Reflection : Struggling Man Who Diverted People From Crime

समाज दर्शन : गुन्हेगारी जमातींना गुन्हेगारीपासून परावृत्त करणारा संघर्ष पुरूष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - गुन्हेगार जमातींना गुन्हेगारीपासून परावृत्त करणा-या आणि स्वत: गुन्हेगार जमातीत जन्म घेऊनही संघर्ष करत सोलापूरचे महापौर झालेल्या भीमराव जाधव यांचा विलक्षण जीवनप्रवास माहितीपटाच्या रूपाने आता आपल्यासमोर येणार आहे. ‘कथा काटेरी कुंपणाची' या शीर्षकाच्या या माहितीपटाची निर्मिती, लेखन प्रा. विलास पाटील यांनी केले आहे.
या माहितीपटाचे नायक भीमराव जाधव आज 91 वर्षांचे असून ते सोलापूरमध्ये स्थायिक झाले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी कैकाडी, पारधी, भाट, भामटा, पामलोर आदी जमातींना कायमचे गुन्हेगार ठरवून तारेच्या कुंपणाच्या खुल्या तुरुंगात ठेवले होते. दिवसातून चार वेळा त्यांना हजेरी लावावी लागत असे. सरकारी माणसे वेळी-अवेळी केव्हाही येऊन त्यांची तपासणी करत असत. त्रास देत असत. अशा परिस्थितीत भामटा जमातीत भीम नावाच्या मुलाचा जन्म झाला.


या मुलाला अगदी लहानपणापासून शिकण्याची ओढ होती. त्यासाठी त्याने कोवळ्या वयापासून संघर्ष केला, कष्ट उपसले आणि तो मॅट्रिक झाला. त्याला शिक्षकाची नोकरी मिळाली. त्याने आपल्या जबाबदारीचे भान जाणले आणि इतरांनीही शिकावे, शहाणे व्हावे, गुन्हेगारी सोडून द्यावी यासाठी सामाजिक कार्याला वाहून घेतले. विशिष्ट जमातींसाठीच असणारा काळा कायदा रद्द व्हावा यासाठी स्थानिक पातळीपासून ते थेट पंतप्रधान नेहरू यांच्यापर्यंत ते पोहोचले. आपल्या व्यथा-वेदना त्यांच्यासमोर मांडल्या आणि सरकारला हा काळा कायदा रद्द करण्यास भाग पाडले.


‘कथा काटेरी कुंपणाची’ या माहितीपटातून भीमरावांचा जीवनप्रवास, संघर्ष, त्यांच्या कार्याची सुरुवात, त्यातील अडचणी, वाड्यावस्त्यांवर जाऊन जीव धोक्यात घालून केलेले काम, अनेक दरोडेखोर, लूटमारी करणा-यांचे केलेले हृदयपरिवर्तन हा सारा भाग प्रेक्षकांसमोर येणार आहे. आज या जमातीतील अनेक युवक गुन्हेगारीचा त्याग करून शिक्षणाकडे वळले आहेत आणि वैद्यकीय, अभियंता, वकिली, आयटी, पोलिस सेवा अशा क्षेत्रांत चांगले काम करत आहेत. यामागे भीमरावांचे अथक प्रयत्न आणि कर्तृत्व उभे आहे. भीमरावांचे हे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे, या उद्देशाने या लघुपटाची निर्मिती केली, असे प्रा. पाटील यांनी सांगितले.


कथा काटेरी कुंपणाची
० एकूण 54 मिनिटांचा माहितीपट
० भीमराव जाधव स्वत: प्रकाशनासाठी उपस्थित राहणार
० काही अनुभव स्वत: कथन करणार
० सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते प्रकाशन
० वाट चुकलेल्या जिवांसाठी आजही कार्यरत
० आश्रमशाळा, वसतिगृहांची निर्मिती
० अनेक कार्यकर्ते घडवण्याचे कार्य