आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॉफ्टवेअर, बॉलीवूड म्हणजे भारत नव्हे ; डॉ. सुधा मूर्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-‘सॉफ्टवेअर, बॉलीवूड म्हणजे भारत नव्हे. मि. मूर्तींना मी नेहमी सांगते की, तुमचा व माझा भारत वेगळा आहे. आदिवासी, अशिक्षित, गरीब भारत माझा आहे. याच मागास भारताची मी प्रतिनिधी आहे’, हे विचार आहेत इन्फोसिस या सॉफ्टवेअर कंपनीच्या कणा ठरणा-या डॉ. सुधा मूर्ती यांचे.

‘चारित्र्य प्रतिष्ठान’तर्फे डॉ. मूर्ती यांचा परराष्ट्र मंत्रालयातील अपर सचिव निनाद देशपांडे यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण अध्यक्षस्थानी होत्या.
एम.टेक. पीएच.डी. करून समजले नाही, ते मी गरीब देशबांधवांसोबत राहून शिकले. गरीब भारताच्या प्रगतीसाठी शक्य त्याने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मूर्ती यांनी केले. अंगात ताप असताना येथे आलेल्या मूर्ती म्हणाल्या, 8 महिन्यांपूर्वी मी निमंत्रण स्वीकारले होते. वचन पाळणे ही आपली संस्कृती आहे. जेआरडी टाटांनी नोकरीसाठी बोलावले तेव्हा अमेरिकेत शिक्षणाची संधी होती. पण वडिलांनी बजावले की, टाटांना दिलेला शब्द पाळला पाहिजे.

राज्याने देशाला दिशा दिली
आगरकर, टिळक, फुले यांच्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली. लंडनच्या म्युझियममध्ये मी शिवरायांचे पोर्ट्रेट
पाहिले. अफझल खानाच्या वधासाठी त्यांनी वापरलेली वाघनखे पाहिली. तेव्हा मी गहिवरून नमस्कार केला. शिवरायांनी देशाला आत्मविश्वास, धैर्य, आत्मसन्मान दिला, असे सुधा मूर्ती म्हणाल्या.
मातृभाषा, मायदेश सर्वोच्च
माझे लेखन कन्नड, इंग्रजीत झाले. माझ्या पुस्तकांच्या मराठी भाषांतराच्या दोन लाखांवर प्रती विकल्या गेल्या. मराठीतून मला जास्त रॉयल्टी मिळते, असे सांगून मूर्ती यांनी मातृभाषा, मायदेश आणि संस्कृती कधीही न विसरण्याचा संदेश दिला.