आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप विशेष : ४५ लाख शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- यंदाच्या खरीप व रब्बी हंगामात ४५ लाख शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका (सॉइल हेल्थ कार्ड) वितरित केली जाणार आहे. रासायनिक खतांच्या संतुलित वापरामुळे शेतकऱ्यांचा अतिरिक्त खर्च टाळला जावा; तसेच अनावश्यक खतवापरामुळे जमिनीची प्रत खालावू नये, यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी ‘दिव्य मराठी'ला दिली.

"बागायती क्षेत्रात अडीच हेक्टरला एक आणि जिरायती क्षेत्रात दहा हेक्टरला एक याप्रमाणे राज्यातून ८.५२ लाख माती नमुने गोळा करण्यात येत आहेत. या नमुन्यांची १६० प्रयोगशाळांमध्ये तपासणी करून शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका देण्यात येईल. पंतप्रधानांनी सुचवलेल्या या कार्यक्रमाची पूर्तता येत्या मार्चपर्यंत केली जाईल. राज्यातल्या सर्व १ कोटी ३७ लाख शेतकऱ्यांना येत्या तीन वर्षांत जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप करणार अाहाेत,’ असे देशमुख म्हणाले.

राज्यात रासायनिक खतांचा वापर पाऊसमानानुसार बदलताे. गेल्यावर्षी ३२ लाख टन खतांचा वापर झाला. यंदा ४२ लाख टन उपलब्धता आहे. राज्याचा प्रति हेक्टरी खत वापर इतर प्रगत राज्यांच्या तुलनेत कमी आहे. या पार्श्वभूमीवर शेतात कमतरता असलेली नेमकी अन्नद्रव्ये शेतकऱ्यांनी वापरावीत, यासाठी जमीन आरोग्य पत्रिकेचा उपक्रम राबवला जात आहे. कोकण व विदर्भातील काही तालुक्यांचा अपवाद वगळता राज्यात शेतजमिनींमध्ये नत्र आणि स्फुरदाची कमतरता आहे. तांबे, लोह, मँगनीज, झिंक या मूलद्रव्यांचे प्रमाणही महाराष्ट्राच्या जमिनीत अत्यल्प आहे. पिकांची उत्पादकता कमी असण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे.

पेरणीची घाई नकाे
>‘मान्सून’च्या दिलासादायक आगमनानंतर पेरण्यांची लगबग सुरू झाली. राज्यातील ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू असल्याने पडलेल्या पावसाचा लाभ घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. मात्र, पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

>सोयाबीन हे खरिपातील दुसऱ्या क्रमांकाचे पीक बनले आहे. सोयाबीनचे सर्व वाण सरळ वाण असल्याने दरवर्षी बियाणे बदलाची गरज नसते. महागड्या बियाण्याच्या खरेदीसाठी पैसे घालवू नयेत. दोन वर्षांतील उत्पादनातील घरचे बियाणे पेरणीसाठी वापरले जाऊ शकते.

१६० प्रयोगशाळांमध्ये माती नमुने तपासणी करून आरोग्य पत्रिका हाेणार
१.३७ कोटी शेतकऱ्यांना
3 वर्षांत जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप हाेणार

कडधान्यास प्राधान्य
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व कृषी विकास योजनेअंतर्गत कडधान्य आंतरपिकांची प्रात्यक्षिके आयोजित केली जाणार आहेत. सोयाबीन+ तूर, कापूस+ मूग, कापूस+ उडीद आणि भात शेतीच्या बांधावर तूर या पीक पद्धतीचा प्रसार केला जाणार आहे.

५० लाख ‘एसएमएस'
‘एम- किसान' पोर्टलच्या माध्यमातून सध्या १५ लाख शेतकऱ्यांना ‘एसएमएस'द्वारे हवामान अंदाज व कृषी सल्ला दिला जाताे. मात्र, येत्या महिनाभरात ५० लाख शेतकऱ्यांना ‘एसएमएस' पाठवावेत, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला केली आहे.

पीक विम्याकडे लक्ष द्या
गेल्या हंगामातील पीक विम्याचे १५९५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. यंदाही शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवून घ्यावा. राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळवण्यासाठी अर्ज करण्याची मुदत ३१ जुलै, तर हवामान आधारित पीक विम्यासाठी ३० जूनपर्यंत अाहे. मात्र, ही योजना लातूर, नांदेड, ठाणे, रायगड, जळगाव, नगर, सातारा, सांगली, अमरावती, यवतमाळ, नागपुर, वर्धा या १२ जिल्ह्यांसाठीच अाहे.