पिंपरी चिंचवड येथे 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला शनिवारी दिमाखात सुरुवात झाली. तीन दिवस भरणाऱ्या या सारस्वतांच्या मेळ्यात पहिल्या दिवशी चांगलीच लगबग पाहायला मिळाली. या सोहळ्याचा वृत्तांत विविध मार्गाने सर्वांपर्यंत पोहोचलाच आहे. पण या सोहळ्यातील पहिल्या दिवसातील काही खास पंचेस आम्ही तुमच्खायासाठी घेऊन आलो आहोत.
झुल अन् बैल
घुमानला झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. सदानंद माेरे यांनी चांगलीच फटकेबाजी केली. संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे सबनीसांकडे देताना ते म्हणाले, ‘काेणतीही सूत्रे देणे म्हणजे झूल टाकणे असे असते. मग ताे बैल असाे वा माणूस...’ ते असे म्हणताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्याच, तर अनेकांनी सबनीसांनाच ‘बैला’ची उपमा दिल्याची कुजबुजही केली. एवढेच नव्हे तर संमेलनाध्यक्षपद म्हणजे साडेअकरा काेटी मराठी जनांसाठी काम करणारा असताे, ते साेपे नाही,’ असा चिमटाही डाॅ. माेरे यांनी काेणाचेही नाव न घेता काढला.
‘खुसखुशीत’ बापट !
उद्घाटन कार्यक्रमाचे निवेदन अभिनेता सुबाेध भावे अाणि अभिनेत्री साेनाली कुलकर्णी करत हाेते. ‘...अाणि अाता अापण सत्कार करणार अाहाेत अगदी ‘खुसखुशीत’ बाेलणारे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचा...’ असे साेनाली कुलकर्णीने म्हणताच एकच हशा पिकला. तर शुभेच्छा देताना बापट ‘संमेलनाएेवजी मराठीच्या अधिवेशनाला शुभेच्छा’ असे म्हणून गेले. त्या वेळी तरुणांमधून अावाजही अाला ‘अहाे, हे तुमच्या सत्तेतील अधिवेशन नाही...’ अाणि रसिकांमध्ये हास्यकारंजी उडाली.
हसून ते पहाणे...
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची एकेक लकब काही तरी सूचित करणारी असते. संमेलनाच्या उद््घाटनाला तर त्यांचे हसणे अनेकांना हसवून गेले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डाॅ. माधवी वैद्य म्हणाल्या की, ‘मुख्यमंत्र्यांनी संमेलनापूर्वीच २५ लाख रुपयांचा धनादेश मंडळाच्या खात्यात जमाही केला.’ तेव्हा स्क्रीनवर मुख्यमंत्री अाणि शेजारीच बसलेले पवार दिसत हाेते. बाईंनी असे काैतुक करताच पवार कुत्सित हसले. त्यामागे काय दडले हाेते, हे महाराष्ट्रातील जनतेला वेगळे सांगायला नकाे.
कवी अापलेच
साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला खासदार रामदास अाठवले अावर्जून उपस्थित हाेते. अाठवलेंच्या कविता प्रचंड लाेकप्रिय अाहेत. किंबहुना साेशल मीडियातून त्या राेज वाचल्या जातात. रामदास अाठवले कार्यक्रमाला प्रारंभी खाली, प्रेक्षकांमध्ये बसलेले दिसले. स्क्रीनवर ते दिसताच उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली अाणि लाेक म्हणू लागले ‘कवी अापलेच...’
संयुक्त महाराष्ट्र...
शरद पवार उभे राहिल्यानंतर "बेळगाव, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे," ही घोषणा काही श्रोत्यांनी दिली. फलकही झळकावले. मात्र पवारांनी त्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले. तर वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आग्रही असलेल्या मुख्यमंत्र्यांनी मात्र या घोषणेची दखल घेतली. ते म्हणाले, ‘शेवटचा मराठी माणूस असेपर्यंत सरकार आणि समाज संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणाऱ्यांच्या पाठीशी आहे.'
एक काेटीची मदत
संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील यांनी दुष्काळग्रस्तांसाठी मदत म्हणून वैयक्तिक एक कोटीचा धनादेश ‘नाम’ फाउंडेशनला दिला.