आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासगाथा: सुगंधी मळ्यातून रंगांची उधळण, लाखोंची उलाढाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सोनेरी रंगाच्या, मादक गंधाच्या सोनचाफ्यांच्या दुर्मिळ फुलांचा मळा फुलवणारा शेतकरी. सुगंधाच्या शेतीतून लाखो रुपयांची उलाढाल. जोडीलाच "डबल' जास्वंदीची लालभडक शेतीही. प्रत्येकी २ एकरांत सोनचाफा व जास्वंदीचा मळा. या ४ एकरांतली वार्षिक उलाढाल ३० ते ३२ लाख रुपयांची व निव्वळ नफा १५ ते १६ लाख रुपयांचा. हा गंधवेडा शेतकरी आहे सुभाष भट्टे.
पालघर जिल्ह्यातल्या सत्पाळे गावात (ता. वसई) भट्टे यांनी पारंपरिक फुलांची अपारंपरिक शेती केली आहे. शासनाच्या ‘वसंतराव नाईक फुलशेती उत्पादन पुरस्कारा'चा मानकरी ठरलेल्या भट्टे यांनी ‘दिव्य मराठी’कडे त्यांची यशोगाथा उलगडली, ती अशी..

‘आमची चार एकर वडिलोपार्जित शेती. परिसरातले बहुतेक जण भाजीपाला पिकवतात. पण या शेतीत अनिश्चितता जास्त. त्यामुळे अर्नाळ्याचे मित्र गोपाळ पाटील यांच्या सल्ल्यानुसार फुलशेतीचा पर्याय निवडला. एकदा सोनचाफा लावला की २५ वर्षे चिंता नसते. त्यामुळे त्यांनी सोनचाफ्याची लागवड निश्चित केली. २००२ मध्ये दापोली (जि. रत्नागिरी) येथून चांगली कलमे आणली. दोन एकरांत ८२० झाडे लावली. मरतुकीनंतर आता सातशे झाडे चांगली आहेत. उरलेल्या दोन एकरांत जास्वदींची नऊशे कलमे लावली. सोनचाफा आणि जास्वदींची नियमित छाटणी करून उंची पंधरा फुटांपेक्षा जास्त वाढू देत नाही. त्यामुळे फुलांची तोडणी बांबूला लावलेल्या तारेच्या आकड्याने होते. एक मजूर दिवसाला हजार ते बाराशे फुले काढतो. बहरानुसार रोज कमीत कमी १०-१२ ते जास्तीत जास्त ३०-३५ मजूर लागतात,’ असे भट्टे सांगतात.

‘सावलीतले, बिनकष्टाचे काम असल्याने मजुरांचा प्रश्न नाही. उन्हाळ्याच्या एक-दोन महिन्यांत आसपासच्या आदिवासी पाड्यावरचे विद्यार्थीही फुलतोड्यातून दहा-बारा हजारांची कमाई करतात आणि स्वावलंबनातून शिक्षणाची व्यवस्था करतात. शंभर फुलांचे पॅकिंग विक्रीला पाठवले जाते. फुलांच्या पॅकिंगचे काम पत्नी सांभाळते. पगारी कामगारांकडून कामे नीट होत नाहीत, त्यामुळे फुलविक्रीसाठी तरुणांना कमिशन देताे,’ असे भट्टे सांगतात.

वर्षभर मागणी
>सोनचाफा आणि जास्वंदीला मुंबईच्या दादर फुलबाजारात वर्षभर मागणी असते.
>सोनचाफ्याला किमान ६० रुपये शेकडा ते कमाल ६०० रुपये शेकडा भाव मिळतो. गणेशोत्सव-नवरात्रात वर्षातला सर्वोच्च दर मिळतो.
>सूर्योदयानंतरच सोनचाफा उमलतो. आधी तोडलेल्या कळ्या उमलत नसल्याने चोरीची भीती नाही.
>गणपतीच्या दिवसांत जास्वंदीला शेकडा हजार रुपयेसुद्धा मिळतात. एरवीही शंभर रुपये शेकडा सरासरी दर मिळतो.
>चार एकरांतून थंडीत पाच-सहा हजार आणि उन्हाळ्यात ३०-३५ हजार फुले मिळतात.

सुखाची फुलशेती
>‘सोनचाफा व जास्वंदीला भरपूर सूर्यप्रकाश, मोकळी हवा, पाण्याचा निचरा होणारी जमीन मानवते. स्प्रिंकलर असल्याने मजूर लागत नाहीत. सोनचाफ्याचा तोडा सूर्योदयानंतर व जास्वंदीचा संध्याकाळी होतो. जास्त ऊन तेवढी फुले जास्त. सोनचाफ्याला इतर कीड-रोगांचा त्रास नाही. जास्वंदीला पांढरी बुरशी लागते. सुदैवाने माझ्या एकाही झाडाला बुरशी नाही. पूर्ण फुलशेती सेंद्रिय आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी मी आणि माझी पत्नी चार एकरांची फुलशेती आरामात सांभाळतो.’
सुभाष भट्टे, फुल उत्पादक शेतकरी
बातम्या आणखी आहेत...