आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DM SPECIAL : विदेशी अभ्यासकांनाही ‘पंढरपूर वारी’ची गोडी ; तत्त्वज्ञान, परंपरेवर संशाेधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - दरवर्षी नेमाने आषाढी एकादशीला  श्रीविठ्ठलाच्या  दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे पायी मार्गक्रमणा करणारी ‘पंढरीची वारी’ अनेक विदेशी अभ्यासकांच्या  संशोधनाचा  विषय ठरत आहे. अमेरिका, जपान, चीन, जर्मन, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, डेन्मार्क, बेल्जियम.. अशा अनेक देशांतील  अभ्यासक श्रीविठ्ठल, पंढरपूर, वारकरी संप्रदाय आणि वारीची परंपरा यांचा अभ्यास करत आहेत. विशेष म्हणजे या अभ्यासकांनी ‘वारी’चा जो अभ्यास येथे केला त्याविषयीचे  त्यांचे  संशोधन, आकलन आणि विश्लेषण त्यांनी आपापल्या भाषेत ग्रंथरूपाने प्रकाशितही केले आहे. जर्मन संशोधक प्रा. कॅथारिना किन्ले या स्टुटगार्ड येथील अभ्यासक असून त्यांनी  ज्ञानदेवांच्या अभंगांचा चिकित्सक अभ्यास केला आणि ते प्रकाशित केले आहे. त्यांनी संस्कृत आणि चिनी भाषेचा तौलनिक अभ्यासही केला आहे.
 
 रशियाच्या  प्रा. इरिना ग्लुष्कोव्ह श्रीविठ्ठलाच्या  दैनंदिन उपचारांचा अभ्यास करत आहेत. हे नित्योपचार त्यांनी चित्रितही केले आहेत. तसेच संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या अभंगांचे त्यांनी रशियन भाषेत अनुवाद केले आहेत. प्रा. इवावो शिमा या जपानी अभ्यासकांनी ज्ञानेश्वरीच्या  सहा अध्यायांचे जपानी भाषांतर केले आहे. पंढरपूरच्या श्रीविठ्ठलावर त्यांनी लेखही लिहिले आहेत.    
 
अमेरिकेच्या  कोलंबिया  विद्यापीठातील ख्रिश्चन नोवेट्स्की यांनी संत नामदेव, महानुभाव आणि ज्ञानेश्वर यांच्या तत्त्वज्ञानावर ग्रंथ लिहिला आहे.
 
फादर जी. ए. डलरी या फ्रेंच संशोधकांचे ‘दि कल्ट ऑफ विठोबा’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.  त्यांनी तुकोबांच्या  १०१ अभंगांचे फ्रेंच भाषांतर केले आहे. फ्रान्सच्याच शार्लोट  वोदविले या विदुषीने ज्ञानदेवांच्या हरिपाठाचे फ्रेंच भाषांतर केले आहे. त्यांनी जर्मन भाषेत संत चोखामेळा यांचे चरित्रही प्रसिद्ध केले. डेन्मार्कच्या  डॉ. एरिक सँड यांनी पायी वारी केली. दिंड्यांची परंपरा, पांडुरंग माहात्म्य, भक्त पंुंडलिक, गोपाळपूर याविषयी अभ्यासपूर्ण लेखन केले आहे.    
 
अभ्यासकांना कुतूहल  
- पंढरपूरचा श्रीविठ्ठल, वारकरी संप्रदाय, वारीची परंपरा, संत मांदियाळी याविषयी विदेशी अभ्यासकांना कुतूहल तर आहेच, पण आपली जिज्ञासा अभ्यासातून, संशोधनातून परिपूर्ण करण्याची त्यांची वृत्ती कौतुकास्पद आहे.  हे सारे अभ्यासक जगाच्या पाठीवरच्या विविध देशांचे प्रतिनिधित्व करतात. पण संस्कृत-मराठी भाषा अवगत करून त्यांनी केलेले आपल्या परंपरा, तत्त्वज्ञानाचे विश्लेषण लक्षणीय आहे.   
वा. ल. मंजूळ,  हस्तलिखितांचे संग्राहक आणि अभ्यासक  
 
हे आहेत विदेशी संशोधक   
प्रा. रेमंडक्रोव्ह (अमेरिका) पायी वारी केली. नाथांच्या कार्याने प्रभावित होऊन नाथांची भारुडे, गाथांचे विश्लेषण इंग्रजीत केले.  
प्रा. मायकेल मार्टिनस (जर्मनी) श्रीगोंद्याच्या शेख मोहंमद  हा त्यांच्या प्रबंधाचा विषय. नाथ संप्रदायाचा  विशेष अभ्यास.   
डॉ. अॅन फेल्डहाऊस (अमेरिका) दीर्घकाळ मराठी संतांचा अभ्यास. डॉ. ढेरे यांच्या ‘श्रीविठ्ठल : एक महासमन्वय’ या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर त्यांनी केले आहे.    
प्रा. चार्लस पेन (अमेरिका) वारकरी संप्रदायाचे अभ्यासक   
डॉ. स्कायहॉक  (जर्मनी) नाथांच्या भागवताचे जर्मनमध्ये भाषांतर   
डॉ. अॅन शूल्टझ  (अमेरिका) हरदासी कीर्तन शिकून अभ्यास   
प्रा. विनांद कॅलेवर्ट (बेल्जियम) नामदेवांच्या अभंगांचे अभ्यासक
बातम्या आणखी आहेत...