आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढोल-ताशांच्या गजरात ‘साहित्य दिंडी’ घुमानकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - टाळ-मृदंगाचा जयघोष.. ज्ञानोबा-माउली-तुकाराम-नामदेवांचे अखंड नामस्मरण.. त्यात प्रत्येक बोगीतून सहभागी होत असलेले प्रवासी.. तर काही ठिकाणी ढोल-ताशांचा गजर अन् साहित्यिकांच्या नावाचा जयघोष.. अशा भारलेल्या वातावरणात बुधवारी पहाटे नाशिककरांची साहित्य टूर घुमानकडे रवाना झाली.
घुमानच्या मराठी साहित्य संमेलनासाठी १२०० साहित्यप्रेमी नाशिकहून बुधवारी रवाना झाले. रेल्वेची वेळ पहाटे ४.५५ ची होती, त्यामुळे बाहेरगावहून येणाऱ्या साहित्य रसिकांची स्टेशनजवळच राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येकाचे विशेष स्वागत करण्यात येत होते. या प्रत्येकाला ओळखपत्र व घुमान येथे गेल्यावर परिधान करण्यासाठी कुर्ता-पायजामाही देण्यात आला.
कुसुमाग्रजांचा नाशिककरांना विसर
घुमानकडे जाणाऱ्या विशेष रेल्वेतील डब्यांना साहित्यिकांची नावे देण्यात आली होती. मात्र त्यात नाशिकचे सुपूत्र व ख्यातनाम मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या नावाचा विसर पडल्याचे दिसून आले. वि. दा. सावरकर, नामदेव ढसाळ, इंदिरा संत, ग. दि. माडगुळकर, बा. भ. बोरकर, म. गो. रानडे, बाबा कदम, व्यंकटेश माडगूळकर, चि. वि. जोशी, केशव मिश्रा, वि. स. खांडेकर, ग्रेस, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, जयवंत दळवी यांची नावे रेल्वेच्या डब्यांना देण्यात आली होती. कुसुमाग्रजांच्या नगरीतून साहित्य संमेलनाला एवढ्या मोठ्या संख्येने रसिक रवाना होतात असताना ही चूक झालीच कशी? असा प्रश्न साहित्य रसिकांना पडला होता.