आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sr.Social Worker Anna Hazare Comment On Congress In Pune

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अधिकार्‍यांची गळचेपी; सीबीआयवर काँग्रेसचे नियंत्रण, अण्णा हजारेंची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- देशातील सीबीआयवर काँग्रेसचे नियंत्रण असून सरकार कायमच तिचा दुरुपयोग करते. सीबीआयला लोकपालच्या नियंत्रणाखाली आणले पाहिजे. सर्वच सीबीआय अधिकारी भ्रष्ट नसून काही जण अधिकारी व नेते चांगले आहेत. पण ते शासनाच्या दबावाला बळी पडतात. काँग्रेस पक्षातील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर आली असून सरकार देशाला भविष्य देणार की नाही, हा प्रश्न सध्या लोकांसमोर उभा आहे. या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी चुकीची धोरणे बदलून चांगल्या धोरणांचा अवलंब करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी पुण्यात केले. कौटुंबिक न्यायालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सस्नेह मेळाव्यात ते बोलत होते.

या वेळी अण्णा म्हणाले, जनलोकपाल आंदोलनावेळी कोअर कमिटीच्या माध्यमातून काम करताना पदांची अपेक्षा बाळगणारे कार्यकर्ते पाहून ती बरखास्त करण्यात आली. त्यामुळे जनतंत्र मोर्चात कोअर कमिटी, कार्यालय स्थापन करायचे नाही तर जनशक्ती संघटित करून सरकारवर दबाव टाकण्याचे काम पुढील काळात करणार आहे.

संघर्षाच्या माध्यमातून राजकारणावर जनशक्तीचा अंकुश ठेवणे महत्त्वाचे असून त्याशिवाय देशात बदल शक्य नाही. अरविंद केजरीवाल हे राजकारणात कार्यरत झाले असून त्यांचा आणि आमचा मार्ग वेगळा आहे. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षासोबत कधीही नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्याचा आमचा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या कार्यक्रमाला पुण्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.

चिदंबरम यांच्या हेतूबाबत शंका
2 जी घोटाळ्यात केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम दोषी नसतील तर त्यांनी पुढे येऊन न्यायालयीन चौकशी करावी. याबाबत चौकशी करत नसल्याचे त्यांच्या भूमिकेबाबत शंका वाटते. दिल्लीतील आंदोलनावेळी मला गरज नसताना तुरुंगात टाकले. रामदेवबाबांना ज्या प्रकारे अटक करून हरिद्वारला पाठवण्यात आले त्याचप्रमाणे मलाही पुण्याहून भंडार्‍याला पाठवले जाणार होते. या सर्व घटनांचे कटकारस्थान चिदंबरम यांचे होते.

सहा कोटी लोक संघटित करणार
देशात लोकपाल स्थापन होण्यासाठी पुढील दीड वर्षात देशात जनतंत्र मोर्चाच्या माध्यमातून सहा कोटी लोकांना संघटित केले जाणार आहे. पहिला टप्पा 28 मार्च रोजी जालियनवाला बाग येथून सुरू होत असून पंजाब, हरियाणा व उत्तर प्रदेशात 40 सभा घेतल्या जाणार आहेत. आगामी निवडणूक जाहीर होताच पुन्हा रामलीला मैदानात आंदोलन करणार असल्याचे हजारे यांनी या वेळी सांगितले.

प्रादेशिक पक्ष घातक
केंद्र सरकारमध्ये सहभागी असलेले पक्ष स्वार्थी भावना ठेवून आघाडीत सहभागी होत आहेत. प्रादेशिक पक्षांच्या मोठय़ा दबावामुळे ते देशाला घातक ठरत आहेत. त्यामुळे भविष्यात अशा पक्षांचा धोका वाढू शकतो.