आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मावळमधून श्रीरंग बारणेंना सेनेची उमेदवारी, खासदार बाबर यांचा पक्षाला \'जय महाराष्ट्र\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसनेकडून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याचबरोबर येथील विद्यमान खासदार गजानन बाबर यांचा पत्ता कट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यमान खासदार बाबर यांनी गेल्या वेळी राष्ट्रवादीचे उमेदावर आझम पानसरे यांचा 80 हजार मतांनी पराभव केला होता. मात्र, हा पराभव राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळीमुळे झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे यंदा सेनेला ही जागा राखायची असेल तर मोठी मेहनत करावी लागणार होती. त्यामुळेच सहा वर्षापूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले श्रीरंग बारणे यांना पक्षाने संधी दिली आहे. बारणे यांची पिंपरी-चिंचवड शहरात चांगली पकड आहे. तसेच मावळ व परिसरात नातेवाईक असल्यामुळे मोठा जनसंपर्क आहे. त्याचा फायदा त्यांना व पर्यायाने शिवसेनेला होऊ शकतो त्यामुळे उद्धव ठाकरेंनी बारणे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.
शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव- पाटील यांच्यासह गजानन किर्तीकर यांनी बारणेंच्या पारड्यात आपले मत टाकले होते. मात्र निलम गो-हे यांनी बाबर यांनाच सधी द्यावी, असे पक्षनेतृत्त्वाकडे कळविले होते. मात्र, निवडून येण्याची क्षमता हा निकष लावून बारणेंना संधी देण्यात आल्याचे सेनेतील सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, सेनेने आपली उमेदवारी कापल्याने गजानन बाबर नाराज झाले असून, त्यांनी शिवसेनेतील सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. बाबर यांनी अद्याप आपले पत्ते खोलले नसले तरी ते मनसेकडून निवडणूक लढविणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेनेने ही जागा आरपीआयला दिली आहे. आरपीआयने संभाजी सपकाळ यांचे नाव जाहीर केले आहे.