आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावी निकाल : प्रलाेभनांचा अभाव, संवादसेतूमुळे ‘काेकण’ अव्वल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - गेल्या काही वर्षांत दहावी- बारावीच्या निकालात काेकण विभाग नेहमीच अव्वल स्थानावर असताे. हे सातत्यपूर्ण यश विद्यार्थी आणि शिक्षकांमधील ‘संवादा’त आहे. शिक्षकांचे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष आणि आधुनिक शहरी विद्यार्थ्यांसमोर असणारा अभ्यासेतर प्रलोभनांचा अभाव, हेही कोकण विभागाच्या यशातील महत्त्वाचे घटक आहेत, असे निरीक्षण शिक्षणतज्ज्ञांनी नोंदवले आहे.
सोमवारी दहावीचा निकाल जाहीर झाला. राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमधून कोकण विभागीय मंडळाने ९६.५४ टक्के निकाल नोंदवून आघाडी घेतली. काही वर्षांपूर्वी राज्यभरात प्रसिद्ध असलेला ‘लातूर पॅटर्न’ २०१० पासून मागे पडत आहे. यंदा लातूर विभाग उत्तीर्णांच्या टक्केवारीत सर्वात खाली (८६.३८ टक्के) आहे.

कोकण विभागीय मंडळाचे प्रभारी अध्यक्ष आणि सचिव रमेश गिरी ‘दिव्य मराठी’शी बोलताना म्हणाले, ‘२०११ मध्ये स्थापना झाल्यापासूनच कोकण विभागाने अव्वल स्थान राखले आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे कोकण विभागात येतात. या यशाचे श्रेय प्रामुख्याने नियमितता, विद्यार्थी शिक्षकांचे परिश्रम, पालकांची सजगता आणि नियोजनपूर्वक अभ्यासात आहे. शाळांमध्ये तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती उल्लेखनीय आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद आहे. विद्यार्थीसंख्या मर्यादित असल्याने वैयक्तिक लक्ष पुरवणे शक्य आहे. मुख्य म्हणजे शहरी जगातली इंटरनेट, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, असंख्य वाहिन्या, चित्रपट, नाटके, अन्य कार्यक्रम यांची प्रलोभने कोकणातील विद्यार्थ्यांना अजून तरी आकर्षित करू शकलेली नाहीत.
त्यांचा वापर मर्यादित आणि अत्यावश्यक तेवढाच आहे. त्यामुळे अभ्यासावरील लक्ष टिकून राहते. विशेष म्हणजेच या विभागात परीक्षेतील गैरप्रकारांचे प्रमाण अत्यंत नगण्य अाहे.

कोकण विभागीय मंडळ
स्थापना: २०११
समाविष्ट जिल्हे : रत्नागिरी, सिंधुदुर्ग
एसएससी विद्यालये : ५९२
दहावीचे विद्यार्थी : ४५ हजार ३८६
एचएससी विद्यालये : १७०
बारावीचे विद्यार्थी : २९ हजार ४२५
शाळांमधील उपस्थिती : ९० टक्क्यांहून जास्त
दर आठवड्याला पालक सभा, गैरप्रकारांचे प्रमाण नगण्य

‘रिझल्ट’चा अट्टहास नाही
^पूर्वी कोकण कोल्हापूर विभागात येत असे; पण स्वतंत्र विभागीय मंडळ स्थापन झाल्यापासून कोकणाने घेतलेली आघाडी टिकवली आहे. कुठल्याही अट्टहासाने रिझल्ट ‘लावले’ जात नाहीत. प्रत्येक विद्यार्थी कुठे कमी पडतोय, ते शिक्षक शोधतात त्यावर परिश्रम घेतात, हाच आमच्या यशाचा मंत्र आहे.- प्रकाशगुजराती, संस्थाध्यक्ष, ज्ञानदीप विद्यालय, खेड

पालक सभा, शिस्तीला महत्त्व
कोकणविभागातील गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील प्राध्यापिका कल्पना आठल्ये म्हणाल्या, ‘कोकणात शैक्षणिक वातावरण टिकून आहे. मुख्य म्हणजे शिक्षक समर्पित वृत्तीचे आहेत. पुढच्या पिढीची जबाबदारी आपल्यावर आहे, या भावनेने शिकवणारे आणि विद्यार्थ्यांशी सतत संवाद साधणारे शिक्षक हा कोकणचा यूएसपी आहे. प्रत्येक शाळेत दर आठवड्याला पालक सभा असते. प्रत्येक विद्यार्थ्याची सखोल माहिती शिक्षकांना असते. नियम, शिस्त, वेळा, नियोजन यांचे भान उत्तम राखले जाते.’
बातम्या आणखी आहेत...