आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीने 65 हजार प्रवाशांना परत दिले 14 लाख रुपये; पुण्यात संपामुळे बससेवा ठप्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- एसटी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर आरक्षित तिकिटांचा परतावा (रिफंड) मिळवण्यासाठी प्रवाशांची पुण्याच्या एसटी स्थानकावर रिघ लागली अाहे. एका दिवसात स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे रेल्वेस्थानक आणि वल्लभनगर (पिंपरी) येथील एसटी स्थानकांतून सुमारे ६५ हजार प्रवाशांनी आपले आरक्षण रद्द करून परतावा घेतल्याची माहिती मिळाली. त्याच वेळी प्रशासनाकडून ४०० खासगी बस तसेच स्कूल बसेस स्थानकात उतरवण्यात आल्याचीही माहिती मिळाली. 
  
एसटी कर्मचारी संघटनांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संप पुकारल्यावर संप एखाद्या दिवसात मिटेल, या आशेवर हजारो प्रवासी होते. मात्र, मंगळवारी रात्री संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी परिवहनमंत्र्यांशी सुरू असलेली बोलणी फिस्कटल्याचे जाहीर होताच, बुधवार सकाळपासून हजारो प्रवाशांनी आरक्षित केलेली तिकिटे रद्द करण्यास सुरुवात केली. बुधवारी दिवसभरात पुणे रेल्वेस्थानक, स्वारगेट, शिवाजीनगर आणि वल्लभनगर (पिंपरी) येथून सुमारे ६५ हजार प्रवाशांनी तिकिटे रद्द केल्याची माहिती विभागीय नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी दिली.    

आरक्षण रद्द करून परतावा (रिफंड) नेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने विभागीय वाहतून केंद्राशी संपर्क साधून रिफंडसाठी सर्व एसटी स्थानकांवर विशेष खिडकी सुरू केली आहे. तेथे प्रवाशांना त्यांच्या रद्द केलेल्या तिकिटांचे पैसे परत दिले जात आहेत. बुधवारी एका दिवसात १४ लाख रुपये रिफंड देण्यात आले, असेही जोशी यांनी सांगितले.    

कर्मचाऱ्यांची दिवाळी खरेदी ‘सीलबंद’   
संप सुरू होण्यापूर्वी एसटीच्या सेवेत चालक-वाहक म्हणून कार्यरत असणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांनी दिवाळीसाठी गावी परतण्यापूर्वी केलेली खरेदी एसटीच्या विश्रांती कक्षात सीलबंद झाली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून कर्मचाऱ्यांनी संप सुरू करताक्षणीच हे विश्रांती कक्ष प्रशासनाने सीलबंद केले आहेत. पुणे विभागात मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातून सुमारे ८०० चालक - वाहक नोकरी करतात. त्यांच्यापैकी अनेकांची दिवाळी खरेदी विश्रांती कक्षात अडकून पडल्याने ते हवालदिल झाले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...