आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Government Not Willing To Improve World Heritage

राज्याच्या अनास्थेमुळे अनेक स्थळे ‘वर्ल्ड हेरिटेज’पासून वंचित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पश्चिम घाटातील 39 स्थळांना युनेस्कोतर्फे वर्ल्ड नॅचरल हेरिटेज साइटचा दर्जा मिळाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील अवघ्या चार स्थळांचा समावेश आहे. राज्यातील आणखीही स्थळे या यादीत समाविष्ट होऊ शकली असती, पण कोल्हापूर वगळता राज्यातील इतर कोणत्याच विभागाने त्यासाठी किमान प्रस्ताव सादर करण्याची तत्परताही दाखवली नाही, अशी खंत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी व्यक्त केली.
नॅचरल हेरिटेज साईट (जागतिक नैसर्गिक वारसास्थळ) हा दर्जा मिळावा, यासाठी राज्यातून फक्त कोल्हापूर विभागाने तत्परता दाखवली होती. त्यानुसार राधानगरी, कोयना, चांदोली आणि कास पठार या चार साईटस वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा मिळवू शकल्या. असा दर्जा मिळालेल्या पश्चिम घाटातील 39 साईटसपैकी 38 साईटस या आधीपासूनच संरक्षित विभागात (अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान) होत्या. कोल्हापूर विभागाने प्रस्तावित केलेली एकमेव नॉन प्रोटेक्टेड साईट (विनासंरक्षित) म्हणजे सातारा जिल्ह्यातील कास पठार. योग्य प्रस्ताव प्रक्रियेमुळे कास पठारालाही हा दर्जा मिळू शकला. राज्यातीलइतर स्थळांची योग्यता व आवश्यकता असूनही केवळ अनास्थामुळेहे भाग्य मिळू शकले नाही, याकडे डॉ. बाचुळकर यांनी लक्ष वेधले.
पर्यावरणप्रेमींमुळे गोवा राज्याला यश
पुणे, नाशिक या विभागांनी जर थोडी तत्परता, आस्था दाखवली असती, तर भीमाशंकर, मावळातील वेल्हे, मुळशी, ताम्हिणी भाग तसेच नाशिकच्या भोवतालचा भाग वर्ल्ड हेरिटेज साइट बनू शकला असता, पण संबंधित वनविभागाने यासंदर्भात कुठलीच कृती केली नाही. गंमत म्हणजे पश्चिम घाटाशी संबंधित सहा राज्यांपैकी (केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा) गोवा राज्याने तर एकही प्रस्ताव सादर न करताच त्याचा अंतर्भाव वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये करण्यात आला. अर्थात त्यामागे पर्यावरणप्रेमींची चळवळ उभी होती.
शासनाला हे करणे शक्य होते
पुणे, नाशिक या वनविभागांनी योग्य वेळी पुणे विद्यापीठ, झुऑलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया, विविध विद्यापीठांतील पर्यावरणशास्त्र विभागातील संशोधक, अभ्यासक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासह चर्चा करून प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक माहितीची जमवाजमव केली असती. डाटा मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत घेता आली असती. केवळ अनास्थेमुळे हे घडू शकले नाही.