आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाट्यसंमेलन स्थळ अजूनही ‘विंगे’तच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अखिल भारतीय नाट्य संमेलनासाठी आलेल्या निमंत्रणे थेट न स्वीकारता, प्रत्यक्ष स्थळदर्शन केल्यावरच संमेलनाचे स्थळ निश्चित करायचे, असा निर्णय घेऊन रविवारी नाट्य परिषदेनेही मराठी साहित्य महामंडळाचीच री ओढली आहे. त्यामुळे नाट्य परिषदेकडे आलेल्या नागपूर, पंढरपूर (सोलापूर) आणि सातारा या तीन निमंत्रणांतून संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी नाट्य परिषदेचे पदाधिकारी या तीन ठिकाणी जाणार असून त्यानंतरच संमेलनाचे ठिकाण जाहीर होणार आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक रविवारी प्रथमच मुंबईबाहेर पिंपरी-चिंचवड येथे घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते वरील निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी निर्णयांची माहिती दिली. या वेळी परिषदेचे उपाध्यक्ष प्रमोद भुसारी, कोशाध्यक्षा लता नार्वेकर, प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, सहकार्यवाह भाऊसाहेब भोईर उपस्थित होते.

नाट्य परिषदेकडे आगामी नाट्य संमेलनाच्या आयोजनासाठी आतापर्यंत नागपूर, सातारा व सोलापूर येथून निमंत्रणे आली आहेत. मात्र बैठकीत झालेल्या चर्चेनुसार या तीनही ठिकाणांना स्वतंत्रपणे भेट देऊन संमेलनाचे स्थळ ठरवले जाणार आहे. त्यामुळे स्थळनिश्चितीबाबतचा निर्णय बहुधा ऑक्टोबर महिन्यात घेतला जाईल, असे मोहन जोशी यांनी स्पष्ट केले.


प्रमुख निर्णय
* ‘नाट्य परिषद आपल्या दारी’ - मुंबईबाहेर प्रथमच परिषदेच्या बैठकींचे आयोजन
* नाट्य परिषदेच्या प्रत्येक शाखेला भेट देऊन त्यांच्या कामाचे ऑडिट करणार
* उत्कृष्ट काम करणार्‍या शाखेला पारितोषिक
* परिषदेच्या सभासदांची माहिती ऑनलाइन
* राज्यभरातील सर्व शाखांच्या पदाधिकार्‍यांसाठी वर्षातून एकदा कार्यशाळा घेणार