आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्ट्रॉबेरीचे सँपलिंग महाबळेश्वरमध्ये यशस्वी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - लालचुटूक रंगाने आणि रसाळ चवीने खवय्यांच्या आवडीचे बनलेले स्ट्रॉबेरीचे इटालियन सॅँपलिंग महाबळेश्वर येथे यशस्वी ठरले आहे. त्यामुळे पुढील वर्षी राज्यातील स्ट्रॉबेरीच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता स्ट्रॉबेरी ग्रोअर असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब भिलारे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. स्ट्रॉबेरीचे माहेरघर मानल्या जाणा-या आणि वैशिष्ट्यपूर्ण स्वादाच्या महाबळेश्वर स्ट्रॉबेरीचे पेटंट मिळवण्यातही असोसिएशनने आघाडी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरी उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे. येथे सुमारे तीन हजार एकरांवर स्ट्रॉबेरी पिकवली जाते. त्यातून एकूण 16 हजार टन उत्पन्न निघते. स्ट्रॉबेरीचे एकरी उत्पन्न सुमारे सात ते आठ टन इतके आहे. मात्र, यंदा प्रथमच इटली येथील रानिया-नाबिया अशा दोन स्ट्रॉबेरी व्हरायटीजचे सॅँपलिंग महाबळेश्वरमध्ये करण्यात आले होते.
शेतक-यांनी एकूण पंधरा टक्के परिसरात हे सॅँपलिंग केले होते. ते यशस्वी ठरले असून एकरी उत्पादन 14 ते 15 टन इतके मिळाल्याचे सिद्ध झाले आहे. या वर्षी उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणारी थंडी कमी झाल्याने उत्पादनावर परिणाम झाला असून स्ट्रॉबेरीचा मोसमही वीस ते पंचवीस दिवस पुढे ढकलला गेल्याचे निरीक्षण भिलारे यांनी नोंदवले.

पुण्यात फेस्टिव्हल - पुण्यात अत्रे सभागृहात 9 ते 1 फेब्रुवारीदरम्यान स्ट्रॉबेरी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात स्ट्रॉबेरी आइस्क्रीम, श्रीखंड, लस्सी, जॅम, जेली, क्रीम, मिल्क शेक असे विविध प्रकारही मिळणार आहेत.

दर्जेदार मालाची हमी - महाबळेश्वर स्ट्रॉबेरीचे पेटंट घेतल्याने ब्रँडिंग सोयीचे होईल. इतर कुणालाही या नावाचा वापर करता येणार नाही. ग्राहकांना उत्तम, दर्जेदार मालाची हमी त्यातून मिळेल आणि फसवणुकीला आळा बसेल. - बाळासाहेब भिलारे, अध्यक्ष असोसिएशन