पुणे- बाबा राम रहीम प्रकरणानंतर खासदार साक्षी महाराज यांनी केलेले वक्तव्य चिथावणीखोर, समाजातील सलोखा व ऐक्यात तेढ निर्माण करणारे तसेच दंगलसदृश कृत्यांना प्रोत्साहन देणारे आहे. ते भारतीय दंडविधान कलम १५३ चा भंग करणारे अाहे. असे गैर वक्तव्य करणाऱ्या साक्षी महाराजांविरोधात पुण्यातील विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन याप्रकरणी गुन्हा नोंदवायचा का, याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
२५ ऑगस्ट रोजी हरियाणामध्ये राम रहीम यांना न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर बाबांच्या अनुयायांनी उद्रेकी कृत्ये केली. या पार्श्वभूमीवर खासदार साक्षी महाराजांनी अत्यंत बेजबाबदार आणि गैर वक्तव्य केले होते. ‘एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप एकीकडे आणि लाखो अनुयायांचे गुरूपद एकीकडे, याचा विचार न्यायालयाने केला पाहिजे,’ अशा आशयाचे हे वक्तव्य सामाजिक सलोख्याला बाधक ठरू शकते, असे तक्रारकर्त्या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.