आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुरूंनी नाकारले, तरी जिद्दीने शिकले भरतनाट्यम‌्, कर्णबधिरतेवर मात करत कलाप्रवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - जगात येताना ती ‘नॉर्मल’ होती. पण दैवाने परीक्षा घेतली आणि अवघ्या सहा महिन्यांची असताना तिला अर्धांगवायूचा जबरदस्त झटका आला. त्या झटक्याने तिच्या पायाची ताकद गेली, शरीर लुळे पडले आणि १०० टक्के बधिरपणा आला. पण आपले नाव सार्थ करत ती जिद्दीने उभी राहिली, झगडली, लढली आणि आपल्या अंगभूत सामर्थ्यांवर ताठपणे ‘कलावंत’ म्हणून उभी राहिली.

तिचे नाव प्रेरणा सहाणे. आई – वडील शिक्षक. प्रेरणाचा जन्म झाला तेव्हा ती नॉर्मल चाइल्ड होती. पण ती सहा महिन्यांची झाली आणि अर्धांगवायूने तिच्या आयुष्यात दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. या झटक्याने तिच्या पायातली ताकद हिरावली, शरीर लुळे पडले आणि मेंदूतील श्रवणकेंद्र उदध्वस्त झाले. अथक वैद्यकीय प्रयत्न आणि आई-वडिलांच्या आधाराने तिच्या शरीरात ताकद आली. मात्र, १०० टक्के कर्णबधिरता कायम राहिली. पण कर्णबधिर आणि मूक प्रेरणाने या अपंगत्वावर जिद्दीने मात केली. तिने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. चित्रकला शिकली आणि मग ध्यास घेतला तो नृत्य शिकण्याचा. जी कला श्रवणावर अवलंबून असते, ते पारखे झाले असतानाही प्रेरणाने हार मानली नाही. अनेक गुरूंनी नकार दिल्यानंतर शुमिता महाजन यांनी तिला भरतनाट्यम् शिकवण्याचे आव्हान स्वीकारले. मग सुरू झाला तो प्रयत्नांचा प्रदीर्घ प्रवास. सलग बारा वर्षांच्या साधनेनंतर प्रेरणाने भरतनाट्यमचा पहिला सगळ्यात कठीण टप्पा गाठला आणि २००७ मध्ये तिने अरंगेत्रम् सादर करून शिखर गाठले. आता नृत्यातच करिअर करण्याचे तिने ठरवले आहे.

गुरूंनीच मला घडवले
प्रेरणा (खुणांच्या भाषेत) म्हणाली, ‘माझ्या गुरूंनीच मला घडवले. मी प्रयत्नात कमी पडले नाही, एवढेच. पण सूर, ताल हे ऐकू शकत नसतानाही त्यांनी संगीताचे एक नवे, अनोखे विश्व माझ्यासमोर खजिन्यासारखे उघडले. आता नृत्यातच काम करायची इच्छा आहे. चित्रेही काढते. या प्रवासात आई-वडील आणि गुरू यांचे श्रेय मोठे आहे.

सूर, ताल, लयीची जाण
प्रेरणा नृत्य शिकण्यासाठी आली तेव्हा मला ते अशक्यप्राय वाटले होते. पण ती जिद्दी आहे. परिश्रम करण्याची तिची तयारी आहे. ती ऐकू शकत नसली तरी सूर, ताल, लयीची तिला उपजत समज आहे. खूप प्रयोग करत तिला शिकवले. भरतनाट्यम् मधील वर्णम्, पदम्, तिल्लाना, अलारिपु, जतिस्वरम् आदी सर्व प्रकार ती शिकली आणि सर्वांचीच ‘प्रेरणा’ बनली.
- शुमिता महाजन, नृत्यगुरू

‘द साऊंड ऑफ सायलेन्स’
३० मे रोजी पुण्यात प्रेरणाच्या नृत्याचे सादरीकरण होणार आहे. ‘द साऊंड ऑफ सायलेन्स’ असे तिच्या कार्यक्रमाचे शीर्षक आहे. बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी ५ ते ८ या वेळात हा कार्यक्रम होणार आहे.

यशदायी ‘प्रेरणा’
प्रेरणाचे आजचे यश अत्यंत खडतर, कष्टपूर्वक प्रवासातून आले आहे. अनेक संकटे, मानहानी, अपमान, वेदना सोसून तिने हे ध्येय गाठले आहे. कुठल्याही कारणाने अपंगत्व वा अपयश आलेल्यांनी त्याच्याशी सामना केला पाहिजे, असे प्रेरणा म्हणते. तिचा हा संदेश सर्वांपर्यंत पोचावा म्हणून मी ‘प्रेरणा’ हे पुस्तक लिहिले आहे. त्याचे प्रकाशन डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते ३० मे रोजी हाेईल.. - डॉ. उज्ज्वला सहाणे
(प्रेरणाची आई)
बातम्या आणखी आहेत...