आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर आयुक्तांनी नाचवले कारवाईचे ‘कागदी घोडे’! साखरसम्राटांच्या २३ कारखान्यांना नाेटिसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे माजी अध्यक्ष खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आदी बड्या सहकारसम्राटांच्या साखर कारखान्यांसह राज्यातील २३ साखर कारखान्यांचे गाळप परवाने निलंबित करण्याचा आदेश साखर आयुक्तांनी काढला आहे. मात्र या कारवाईमुळे ऊस उत्पादकांचे थकीत पैसे मिळण्याची मात्र खात्री नाही.

राज्यातल्या सर्व साखर कारखान्यांचे गाळप बंद होऊन एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. गाळपच सुरू नसल्याने गाळप परवाना निलंबित करण्याला काहीच अर्थ नाही. शिवाय, दर हंगामातली ऊस उपलब्धता दाखवून दरवर्षी साखर आयुक्तांकडून नव्याने गाळप परवाना घ्यावा लागतो. या पार्श्वभूमीवर गाळप परवाने निलंबित करण्याचा निर्णय साखर आयुक्तांनी घेतला अाहे. मात्र हंगाम संपल्यानंतर घेतलेला हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे साखर क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

हंगाम संपल्यानंतरही राज्यातल्या २५ साखर कारखान्यांनी तब्बल ९०५ कोटी रुपयांची उसाची रास्त व किफायती किंमत (एफआरपी) शेतकऱ्यांना दिलेली नाही. यापैकी २३ कारखान्यांचा गाळप परवाना रद्द करण्याचा निर्णय राज्याचे साखर आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला. दोन कारखान्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, तर न्यू फलटण (सातारा) आणि सीताराम महाराज (सोलापूर) या कारखान्यांना अनुक्रमे २० कोटी ४० लाख व ९ कोटी ३६ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

साखर दरात सातत्याने चढ-उतार राहिल्याने कारखान्यांकडे खेळत्या भांडवलाची कमतरता असल्याची तक्रार यंदाच्या हंगामात सातत्याने झाली. परिणामी सन २०१५-१६ च्या हंगामात ३१ मेअखेरपर्यंत साखर कारखान्यांनी १६ हजार ४७९ कोटी रुपयांची ‘एफआरपी’ थकवली होती. साखर आयुक्तालयाकडून सातत्याने दबाव आणल्यानंतरही ‘एफआरपी’चा प्रश्न मिटलेला नाही. दरम्यान, कारखान्यांनी येत्या आठवडाभरात शंभर टक्के ‘एफआरपी’ न दिल्यास साखर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्तालयाने दिला आहे.

या कारखान्यांचे परवाने निलंबित
सहकारमहर्षी, सिद्धेश्वर, वसंतराव काळे, विठ्ठल, सासवड माळी शुगर, भीमा टाकळी, संत दामाजी, बबनराव शिंदे खासगी, जकराया खासगी, जयहिंद शुगर खासगी (सोलापूर), सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, कुकडी (नगर), येडेश्वरी खासगी (बीड), पूर्णा सहकारी युनिट-१, पूर्णा सहकारी युनिट-२, (हिंगोली), योगेश्वरी खासगी (परभणी), छत्रपती (बीड), आर्मस्ट्राँग खासगी (नाशिक), संत एकनाथ (औरंगाबाद), व्यंकटेश्वरा (नागपूर) आणि नीरा-भीमा, कर्मयोगी, सोमेश्वर (पुणे) साखर कारखाना.
बातम्या आणखी आहेत...