आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळ निवारणासाठी कारखान्यांचा मदतीचा हात - हर्षवर्धन पाटील

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राज्यातील बहुतांश भागातील दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी साखर कारखान्यांनी मदतीचा हात पुढे केल्याची माहिती सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री दुष्काळ निवारणनिधीसाठी कारखान्यांनी 67 कोटी रुपये देऊ केले आहेत, असेही पाटील म्हणाले.

दुष्काळ निवारणासाठी साखर कारखान्यांनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन यापूर्वी केले होते. त्याला प्रतिसाद देत गाळप झालेल्या उसाच्या प्रमाणात प्रतिटन दहा रुपये याप्रमाणे कारखान्यांनी दुष्काळनिवारणनिधीसाठी साह्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा राज्यात 675 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यामुळे दुष्काळनिवारणनिधीसाठी सुमारे 67 कोटी रुपये जमा होतील, असा अंदाज आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

कारखान्यांप्रमाणेच पतसंस्था, जिल्हा बँका, कृषी उत्पन्न बाजार समिती यांनीही दुष्काळनिवारणनिधीसाठी आपली जबाबदारी स्वीकारून वाटा उचलावा, असे आवाहनही त्यांनी केले. गाळप संपल्याने आता कारखाने बंद झाले आहेत. पण ऊस वाहून नेणार्‍या ट्रॅक्टर्सनी सिंटेक्स बसवून ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच पशुधन राखण्यासाठी सरकारकडे अर्ज करून चाराछावण्या उघडल्या पाहिजेत. त्यासाठी बगॅसमध्ये योग्य मिश्रणे करून जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.