आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासगी कारखान्यांचा दुष्काळी भागात फड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राज्यातील दुष्काळी भागात खासगी साखर कारखान्यांचे पेव फुटले असून सहकारी साखर कारखान्यांची संख्या ‘खासगी’ने मागे टाकली आहे. राज्यात 13६ खासगी कारखान्यांची उभारणी प्रगतिपथावर आहे. कणकवली, संगमनेर आणि जळगाव येथील आणखी तीन कारखान्यांनी साखर आयुक्तालयाकडे अर्ज केला आहे.
धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता यांच्या सहकार्याने पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रात उभारला. खासगी कारखान्यांचे वर्चस्व मोडीत काढण्याचा उद्देश यामागे होता. सध्या नोंदणीकृत सहकारी कारखान्यांची संख्या दोनशेच्या घरात आहे. गेल्या हंगामात 123 कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळप केले. प्रत्यक्षात आर्थिकदृष्ट्या सक्षम सहकारी कारखाने हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत. साखर कारखानदारीची वाटचाल पुन्हा खासगीकडून खासगीकडे सुरू झाली आहे.
साखर कारखाना उभारणीसाठी दोन कारखान्यांमधील हवाई अंतर पंधरा किलोमीटर असावे लागते. बहुसंख्य सत्ताधा-यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गुंतवणूक खासगी कारखानदारीत आहे. संभाव्य स्पर्धा टाळण्यासाठी या सत्ताधा-यांनी गेल्याच वर्षी हवाई अंतराची अट वाढवून तीस किलोमीटरवर नेली आहे.
वार्षिक पर्जन्यमान जेमतेम पाचशे ते सातशे मिलिमीटर असलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाणी पिणा-या ऊस पिकावरची कारखानदारी वाढू लागली आहे. सांगली, सोलापूर, नगर, उस्मानाबाद, लातूर, बीड, औरंगाबाद, परभणी, जालना या अवर्षणग्रस्त भागातील भूजल पातळी ज्या गतीने खालावते आहे, त्याच गतीने साखर कारखान्यांची संख्याही वाढते आहे.
सोलापूरचा वर्षाचा पाऊस 545.4 मिलिमीटर. वार्षिक पर्जन्यमानाची ही सरासरी राज्यात सर्वात कमी आहे, परंतु साखर कारखान्यांची सर्वाधिक संख्याही याच जिल्ह्यात आहे. सोलापुरात 30 खासगी साखर कारखाने प्रस्तावित आहेत. यातील काहींची उभारणी पूर्ण झाली असून गाळपही सुरू झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात लवकरच 1६ खासगी कारखाने सुरू होतील. नगर आणि बीडमध्ये अनुक्रमे 14 व 13 आणि औरंगाबादेत ७ खासगी कारखाने प्रगतिपथावर आहेत. सांगली (७), परभणी (4), जालना (3), लातूर (4) या पाणीटंचाईच्या जिल्ह्यांमध्येही खासगी कारखाने येऊ घातले आहेत.
‘खासगी’कडे ओढा - मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील कित्येक मंत्री-पुढा-यांचा उदय सहकारी साखर कारखानदारीतून झाला. अजित पवार, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते-पाटील, बबनराव पाचपुते, बबन शिंदे (राष्ट्रवादी), विलासराव देशमुख, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील (कॉँग्रेस) गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, विनोद तावडे, सुभाष देशमुख (भाजप) यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेकांना ‘खासगी’ व्यवहार सोयीस्कर वाटू लागला आहे.