आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साखरेच्या गोडव्यातून उभी राहणार राज्यात स्मार्ट सिटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी’च्या स्वप्नपूर्तीसाठी आता साखर कारखान्यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. शहरांमधून साचणारे कचऱ्याचे डोंगर पर्यावरणपूरक पद्धतीने नष्ट करणे, शहरांना वीज देणे, वायू प्रदूषणाचा विळखा सोडवणे ही कामे साखर कारखाने चुटकीसरशी करू शकतात. याबद्दलचा तांत्रिक प्रस्ताव शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाने केंद्राला दिला आहे.

‘शहरांजवळ असणाऱ्या साखर कारखान्यांकडचे तंत्रज्ञान आणि जागेचा उपयोग शहरे स्मार्ट बनवण्यासाठी करता येऊ शकतो. केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांच्याशी याबद्दल चर्चा झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही यास अनुकूल आहेत,’ अशी माहिती शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजय अवस्थी यांनी दिली. ‘कचऱ्याच्या वाढत्या ढिगांमुळे देशातली बहुतेक शहरे त्रस्त आहेत.

कचरा निर्मूलनाचे हुकमी उपाय शहरांना उपलब्ध नसल्याचे दिसते. महापालिकांचा हा प्रश्न साखर कारखाने सोडवू शकतात. साखर कारखान्यांमध्ये बगॅस जाळून ऊर्जा निर्मिती केली जाते. महापालिका- नगरपालिकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ओला- सुका असा वर्गीकरण केलेला कचरा जवळच्या कारखान्यांना पुरवला तर त्याची विल्हेवाट सहजपणे लागेल. रोज सुमारे शंभर ते दीडशे टन कचरा बगॅसबरोबर जाळता येईल. यातून निर्माण होणारी वीज शहराला देता येईल. सध्या देशात १० टक्के इथेनॉल मिश्रणाला परवानगी आहे. दैनंदिन पाच हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेच्या कारखान्यातून दररोज बाराशे वाहनांना पुरेल इतक्या इथेनॉलची निर्मिती होऊ शकते. इथेनॉलमिश्रित इंधनामुळे वायू प्रदूषणाचा विळखा सैल होईल. साखर कारखान्यांच्या आवारात सोलार पॅनेल बसवून सौर ऊर्जेची निर्मिती करता येईल,’ असे अवस्थी म्हणाले. ‘वीज, साखर आणि ऊर्जा उत्पादनाच्या माध्यमातून शहरे स्मार्ट करणारे तंत्रज्ञान साखर कारखान्यांकडे आहे. आम्ही दिलेल्या या मॉडेलवर केंद्राकडून प्रतिसादाची अपेक्षा आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

गडकरींचा भर इथेनॉलवर
पेट्रोल- डिझेलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिश्रणासाठी पेट्रोलियम कंपन्यांना २६६ कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. गेल्या वर्षी साखर कारखाने जेमतेम ७० कोटी लिटर इथेनॉल पुरवू शकले. साखर कारखान्यांची इथेनॉल उत्पादन क्षमता प्रचंड आहे. मात्र, देशातील ६३० पैकी केवळ १३० कारखान्यांकडेच सध्या इथेनॉल निर्मिती प्रकल्प आहेत. उसाव्यतिरिक्त तांदूळ, मका, कापूस, सोयाबीन आदी पिकांपासून प्रचंड बायोमास उपलब्ध होते. यामुळे इथेनॉल मिश्रणाची टक्केवारी २० टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आग्रही आहेत.

सेल्युलोज इथेनॉलची निर्मिती
पाच हजार टन दैनंदिन गाळप क्षमतेच्या साखर कारखान्यात दररोज सुमारे दीड हजार टन बगॅस तयार होतो. बगॅस आणि टाकाऊ बायोमासपासून सेल्युलोज इथेनॉलची निर्मिती करता येते. स्वीडनमध्ये हा प्रयोग व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाला आहे. प्रचंड बगॅस व टाकाऊ बायोमास असणाऱ्या भारताने याचा उपयोग करून घ्यायला हवा. कचऱ्यापासून मुक्तता आणि वीजनिर्मिती हे दोन्ही फायदे यातून साधतील. - संजय अवस्थी, अध्यक्ष, शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया
बातम्या आणखी आहेत...