आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BLOG: वाचाळविरांची तोंडपाटिलकी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फार जुनी गोष्ट नाहीच. पाच-सहा वर्षांपुर्वीच्या पुणे, सांगली महापालिका, सिंधुदुर्गातील नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमधले ज्येष्ठ मंत्री नारायण राणे आणि त्याच सरकारमधले गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यातला कलगीतुरा प्रचंड गाजला होता. अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम यांना लक्ष्य केलं होतं. तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या व्यक्तीगत टीकेमुळं राज्यातल्या जनतेची प्रचंड करमणूकही झाली. राणे-पाटील यांच्यातले आरोप-प्रत्यारोप तर एकमेकांना रक्तबंबाळ करणारे होते. कधी संयम न सोडणाऱ्या शरद पवारांनीही पृथ्वीराज चव्हाण यांना लकवा मारतो का, अशी खालच्या पातळीवरची टीका केली होती.

वानगीदाखल काही -
“एक गृहस्थ फार साधूसंतांचा आणि सज्जनतेचा आव आणून राज्यात फिरत असतात. परंतु इथे येऊन पाहिले तर काय? राज्याचा गृहमंत्री पोलिसांवर हल्ला करणा-या गुंडांच्या मांडीला मांडी लावून बसतो. समाजाची सुरक्षा करणारे पोलिसच जिथे सुरक्षित नसतील, तिथे सामान्य जनतेचे काय? परंतु ते तरी काय करणार? राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारच तसे दिले आहेत. गेल्या पाच वर्षात या शहराची जी वाट त्यांनी लावली आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात चीड आहे. म्हणून त्यांना उमेदवार मिळत नसावेत. बहुतेक प्रत्येक पोलिस ठाण्यात फोन करून गृहमंत्र्यांनी तुरुंगातील सर्व गुन्हेगारांना बोलावले आणि त्यांना तिसट्रे दिली. या निवडणुकीत चाळीस गुन्हेगारांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा प्रचार आबांना करावा लागतो. एका सभेला आर. आर. पाटील गेले. ते स्टेजवर चढत असताना पोलिस निरीक्षकाने सांगितले. साहेब, स्टेजवर जाऊ नका, सर्व गुंडच स्टेजवर आहेत. त्यांच्या सोबत गृहमंत्र्यांचा फोटो आला तर लोक तुम्हालाच नाव ठेवतील. त्या गुंडांना अगोदर खाली उतरवा आणि मग तुम्ही स्टेजवर जा. त्यावर आबा म्हणाले, नको नको, त्यांना नका खाली उतरवू. गुंडांना खाली उतरविले तर मी एकटाच वर राहीन (हशा). असे हे गृहमंत्री. राज्याचे गृहमंत्री सांगलीचे आणि सर्वाधिक जास्त गुन्हेगारी सांगलीमध्येच आहे.”           
-नारायण राणे, सांगली महापालिका निवडणूक प्रचारात. 2013.

“सिंधुदुर्गात दहशतवाद म्हणणाऱ्या पुण्यातील टग्याची टगेगिरी पुण्यात किती दहशतवाद आहे, हे पाहावे, पुण्याच्या टग्याची टगेगिरी सिंधुदुर्गात चालणार नाही. तुम्ही कोण केवळ एक उपमुख्यमंत्री तुम्हांला कोण विचारतंय? सत्ता आमची आहे, मुख्यमंत्री आमचा आहे. उपमुख्यमंत्री जस्ट लाइक कॅबिनेट मिनिस्टर. लग्नात नवऱ्याच्या बाजूला धेडा.” 
–(अजित पवारांचे नाव न घेता) नारायण राणे, सिंधुदूर्ग जिल्हा परिषद प्रचारात. 2012.

"जिल्ह्यातील राष्ट्रवादी म्हणजे क्रिमिनल, करप्टेड आणि गुंडांची टोळी आहे. प्रचाराला पुरेसा वेळ मिळाला नाही. अन्यथा गावागावांत जाऊन राष्ट्रवादीच्या दोन्ही मंत्र्यांची लांबी-रुंदी काढली असती.‘‘ 
-पतंगराव कदम, सांगली, कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद विजयी सभेत. 2012

'समोरच्या माणसाचे दुःख समजून त्याच्या अर्जावर तातडीने सही करण्याची प्रशासकाची भूमिका हवी; पण, अलीकडे प्रशासनातील लोकांचा सही करताना हात थरथरतो. त्यांना लकवा भरतो की काय ते कळत नाही. 'विलासराव (देशमुख) एका सेकंदात सही करून निर्णय घ्यायचे. हल्ली तीन-तीन महिने महत्त्वाच्या कामांबाबत सहीच होत नसल्याचे कळते.”
- 'आठवणीतले विलासराव' या पुस्तक प्रकाशन समारंभात शरद पवार, पुणे. 2013.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमधल्या जबाबदार आणि ज्येष्ठ, अनुभवी नेत्यांची ही सगळी विधाने निवडणूक काळातली आहेत. प्रचार संपल्यानंतर काय लागायचा तो निकाल लागला. पण राज्यातल्या सरकारला काडीचाही धक्का पोचला नाही. ना आर. आर. पाटलांनी मांडी कापून घेतली ना ‘स्वाभिमानी’ राणे मंत्रीमंडळातून बाहेर पडले ना अजित पवारांनी पतंगरावांची अंडीपिल्ली बाहेर काढली.

सत्ताचुंबकाचं आकर्षण जबरदस्त असतं....
आताही सगळं काही तसंच घडतंय. किरीट सोमय्या उद्धव ठाकरे यांच्या कथित कंपन्यांची जंत्री मांडू लागले आहेत. उद्धव ठाकरे भाजपवर गुंडांचा पक्ष असल्याचा आरोप करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेवर राजकीय फिक्सींगचा आरोप करताहेत. भाजप, शिवसेनेचे मंत्री येत्या 21 तारखेपर्यंत भरपूर वाचाळपणा करतील. त्यानंतर पुन्हा भानावर येतील. 2019 पर्यंत मिळालेली सत्ता इतक्या लवकर सोडण्याचा मुर्खपणा कोण करेल?

(समाप्त)

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून इन्फोग्राफिक्समधून पाहा, वाचाळविरांची तोंडपाटिलकी..!

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...