आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रिया सुळेंना झोंबला ‘मराठवाडी’ ठसका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - नुकत्याच राज्यसभेवर निवडून गेलेल्या काँग्रेस खासदार रजनी पाटील यांनी केलेला पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना चांगलाच झोंबला. तत्पूर्वीही पाटील यांच्यासाठी प्रतीक्षा करण्याच्या विनंतीमुळे संतापलेल्या सुळे यांनी मेणबत्ती फेकून दिली.

निमित्त होते पुणे महापालिकेच्या महिला महोत्सवाचे. राष्ट्रवादीचे बहुमत असलेल्या पुणे महापालिकेतील महापौरपद, स्थायी समिती अध्यक्षपद व इतर महत्त्वाची पदे ‘राष्ट्रवादी’कडेच आहेत. संख्याबळाच्या वर्चस्वामुळे मित्रपक्ष काँग्रेसला न जुमानता ‘राष्ट्रवादी’चा कारभार सुरू असतो. यातूनच सुळे यांचे मानापमान नाट्य नुकतेच रंगले.

महिला महोत्सवाचे उद्घाटन निर्धारित वेळेपूर्वी करण्याचा आग्रह सुळे यांनी धरला. त्याच वेळी काँग्रेस नगरसेविकांनी त्यांना सांगितले, ‘आमच्या खासदार रजनी पाटील यांनादेखील महोत्सवासाठी निमंत्रित केले आहे. त्या मागून येतच आहेत. त्यांच्यासाठी आपण काही मिनिटांची प्रतीक्षा करावी. उद्घाटनाची वेळ अद्याप झालेली नाही.’ पाटील यांच्यासाठी थांबण्याची विनंती येताच सुळे भडकल्या. दीप प्रज्वलनासाठी हातात घेतलेली मेणबत्ती काँग्रेस नगरसेविकांकडे भिरकावून देत त्या म्हणाल्या, ‘प्रसिद्धीसाठी मी काही करत नाही. मी आता उद्घाटन करणारच नाही. ज्यांच्याकडून तुम्हाला करून घ्यायचे त्यांच्याकडून करून घ्या.’

सुळे यांच्या या पवित्र्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेविकांमध्येही चांगलीच बाचाबाची झाली. या गोंधळातच उद्घाटन झाल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर रजनी पाटील त्यांच्या सर्मथकांसह सभागृहात दाखल झाल्या. मात्र, त्यांच्याशी औपचारिक संवाद साधण्याचेही सौजन्य सुप्रिया सुळे यांनी दाखवले नाही. दरम्यान, कार्यक्रमानंतर सर्वपक्षीय नगरसेविकांनी सुळे यांच्या वर्तनबद्दल नाराजी व्यक्त केली. या मानापपान नाट्यामुळे उपस्थितांमध्ये चर्चा रंगली होती. तसेच वादाचे नेमके कारण काय होते याचीही अनेकांना उत्सुकता होती.

निर्णय पवारांचा नव्हे, गांधींचा - ‘‘केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीच महिलांना 33 टक्के आरक्षणाचा हक्क मिळवून दिला,’ असे नंतर झालेल्या भाषणात सुप्रिया सुळे यांनी सांगितले. पाटील यांनी मात्र सुळे यांचा दावा सपशेल खोडून काढला. ‘महिलांना आरक्षण देण्याचा आदेश माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी दिला होता. त्याची अंमलबजावणी पवार यांनी केली तेव्हा ते काँग्रेसचेच मुख्यमंत्री होते,’ असे पाटील यांनी सुनावले.