आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Kalmadi News In Marathi, Congress, Pune Lok Sabha Seat

इतर दागींना उमेदवारी, मलाच का डावलले?,सुरेश कलमाडींचा सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘माजी मंत्री पवनकुमार बन्सल यांना उमेदवारी मिळते. लालूप्रसादांच्या तर अख्ख्या पक्षाबरोबरच मैत्री केली जाते. मग मलाच का उमेदवारी नाकारली जाते?’ असा सवाल कॉँग्रेसचे निलंबित नेते, राष्‍ट्रकुल घोटाळ्यातील आरोपी व पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांनी पक्षश्रेष्ठींना केला आहे. कॉँग्रेसने आपल्यावर अन्याय केला असल्याची खंतही त्यांनी शुक्रवारी व्यक्त केली.


पुणे मतदारसंघातून कॉँग्रेसने विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर काही निवडक पत्रकारांशी बोलताना कलमाडी म्हणाले की, कॉँग्रेसने इतर कलंकित नेत्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. माझ्यावरचे आरोप अजून न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत. खटला सुनावणीच्या स्तरावर आहे. मी निर्दोष आहे, हे न्यायालयात मी सिद्ध करून दाखवीन. ज्यांच्यावर आरोप सिद्ध झाले त्यांना उमेदवारी देणा-या पक्षाने माझा मात्र विचार केला नाही. पक्षाला अडचणच होती तर माझ्या पत्नीला उमेदवारी द्यायची होती, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


कलमाडी यांनी शुक्रवारी दिवसभर समर्थकांच्या भेटी घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. मात्र अद्याप त्यांनी निवडणुकीतील भूमिका जाहीर केलेली नाही. ‘मी कॉँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. आणखी काही समर्थकांच्या भावना जाणून घेऊन, त्यांच्याशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.


दबावाचे राजकारण
फारसे पर्याय समोर नसल्याने कलमाडी यांनी काँग्रेसला विरोध करू नये, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. पक्षाने निलंबनाची कारवाई मागे घ्यावी, यासाठी कलमाडी यांना दबावाचे राजकारण करावेच लागेल. कॉँग्रेसने काही तरी ‘कमिटमेंट’ द्यायला हवी, अशी अपेक्षा कलमाडी यांना असल्याचे त्यांच्या एका समर्थकाने सांगितले.


विश्वजित कदमांना धास्ती
कलमाडी यांची पुण्यातील ताकद लक्षात घेता त्यांचा विरोध अडचणीचा ठरू शकतो, याची जाणीव कॉँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांना आहे. म्हणूनच कलमाडी यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कदम यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यासह कलमाडी यांची शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.