आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाडकरांनी पदार्पणातच जिंकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘आज माझ्या परीक्षेचा दिवस आहे. अभिजात संगीताच्या इतक्या मोठ्या व्यासपीठावर बसण्याची संधी मला प्रथमच मिळाली आहे. मला लेकरू समजून मी जे सादर करेन ते गोड मानून घ्या,’ अशी लडिवाळ विनंती करत प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी रविवारी ‘सवाई’च्या रसिकांना पदार्पणातच जिंकून घेतले.
‘सवाई’च्या स्वरमंचावर प्रथमच सुरेश वाडकर यांचे गायन झाले. हा मंच शास्त्रीय संगीताचा आहे. वाडकर हे पार्श्वगायक म्हणून सुपरिचित असले तरी त्यांना पतियाळा घराण्याची उत्तम तालीम पंडित जियालाल बसंत यांच्याकडून लाभली आहे. त्याचे प्रतिबिंब जमलेल्या प्रचंड गर्दीत दिसत होते. पाऊल ठेवायलाही जागा मिळणार नाही अशी रसिकांची उच्चांकी गर्दी हाेती.
तुम्हा सर्व रसिकांना साष्टांग दंडवत, असे म्हणून वाडकर यांनी राग यमनने सुरुवात केली. पहिल्या आलापातच त्यांनी आपला घरंदाज दर्जा दाखवून दिला. रागरूप दर्शवणाऱ्या यथोचित आलापी, द्रुत व अतिद्रुत तानांच्या लडींनी त्यांनी यमन सजवला. त्यानंतर ‘लागे तोसे नैन’ ही ठुमरीही पेश केली. रसिकांच्या मागणीला मान देत ‘पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा’ आणि राग मालकंसवर आधारित ‘विठ्ठल आवडी प्रेमभावो’ या भक्तीरचनांनी वातावरण भक्तिमय केले.
बातम्या आणखी आहेत...