आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरिक्त शिक्षक तात्पुरते ‘रिक्त’ जागांवर ! नावेही संकेतस्थळावर उपलब्ध होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्यात अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढत आहे, या पार्श्वभूमीवर शिक्षकांना सामावून घेण्यासाठी प्रवर्गनिहाय जागा नसेल, तर अन्य रिक्त जागांवर अशा शिक्षकांचे तात्पुरते समायोजन करा, असा आदेश शासनाने नुकताच काढला आहे. त्यानुसार अशा शिक्षकांची नावे संकेतस्थळावर जाहीर करण्यात येत आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही पातळ्यांवर अतिरिक्त शिक्षकांची संख्या हजारोंनी असल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे.

नुकत्याच काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार २०१५-१६ ची सुधारित संचमान्यता जाहीर करण्यात आली आहे. राज्यात अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढत आहे, हे चित्र एकीकडे तर दुसरीकडे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत, हेही वास्तव आहे. परंतु शिक्षक आणि रिक्त जागा प्रवर्गनिहाय भरणे, याचा ताळमेळ अद्याप जमलेला नाही. मात्र, अनेक ठिकाणी शिक्षक अतिरिक्त असूनही त्यांचे पगार शासनाला करावे लागत आहेत.
उदाहरणार्थ, शिक्षक पदाची एक जागा रिक्त आहे. नियमानुसार त्या पदावर अनुसूचित जातीमधील शिक्षक भरणे आवश्यक आहे. मात्र, त्या जिल्ह्यात अनुसूचित जातीमधील शिक्षक नाही; पण खुल्या प्रवर्गातील दोन शिक्षक आहेत. त्यामुळे ते दोन शिक्षक अतिरिक्त ठरतात आणि शिवाय जागा रिक्तच राहते. या अडचणी राज्यभर उद््भवत असल्याने अंतिमत: विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे आणि अतिरिक्त शिक्षकांच्या पगाराचा ताण सरकारी तिजोरीवर पडत आहे. यावर उपाय म्हणून ताज्या आदेशानुसार अतिरिक्त शिक्षकांचे तात्पुरत्या स्वरूपात रिक्त पदांवर समायोजन करावे, असे शासनाने म्हटले आहे. शिवाय प्रवर्गानुसार शिक्षक उपलब्ध नसल्यास विषयानुरूप (गणित, इंग्रजी) शिक्षकांची तात्पुरती नेमणूक करावी, म्हणजे अतिरिक्त शिक्षकांना काम केल्याचा पगार देतो, असे समाधान तरी यंत्रणेला मिळणार आहे.

तीन हजार संस्थांनी दिली माहिती
सध्या शिक्षण विभागाकडून edustaff.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अशा शिक्षकांची माहिती भरून घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यभरातून सुमारे तीन हजार संस्थांनी माहिती भरली आहे. ही आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. राज्यात अतिरिक्त शिक्षकांची संख्या ६ हजार ६७४, तर रिक्त जागांची संख्या ५ हजार ७६३ आहे. त्यात ८३३ शिक्षक प्राथमिक शाळांचे आहेत. प्राथमिक शिक्षणात रिक्त जागांची संख्या ४९९ आहे. माध्यमिक शिक्षणात अतिरिक्त शिक्षकसंख्या ५ हजार ८४१ आणि रिक्त जागांची संख्या ५ हजार २६४ आहे. नोंदणी अजून सुरू असून आठवडाभरात चित्र पुरेसे स्पष्ट होईल.
बातम्या आणखी आहेत...