आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: सरकारच्या आकड्यांवरून स्वाभिमानी गोंधळात, कर्जमाफीचा ‘अभ्यास’ सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ३४ हजार कोटींची कर्जमाफी आणि ८९ लाख शेतकऱ्यांना लाभ या राज्य सरकारच्या आकड्यांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना गोंधळात सापडली आहे. त्यामुळे जिल्हावार कर्जबाजारी शेतकऱ्यांची आकडेवारी गोळा करून मुख्यमंत्र्यांसमोर अभ्यासाअंती जाण्याची तयारी संघटनेने चालवली आहे. कर्जमाफीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक नुकतीच पुण्यात पार पडली. संघटनेचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. अनेकांनी तालुकानिहाय, जिल्हानिहाय आकडेवारी सादर करत कर्जमाफीच्या निकषांमुळे बहुसंख्य शेतकरी वंचित राहण्याची भीती व्यक्त केली हाेती.  

कर्जमाफी नेमकी कोणाची याबद्दल संशयाचे वातावरण आहे. जे कुटुंब निव्वळ शेतीवर जगते त्याची जमीन दहा एकर असू दे अथवा शंभर एकर अशा प्रत्येकाला कर्जमाफी मिळायला हवी. चारचाकी गाडी असण्याचा नियमही अन्यायकारक आहे. कारण २०-३०  हजारांत चारचाकी येते. अशांना तुम्ही श्रीमंत म्हणणार का?, असा सवाल शेट्टी यांनी केला. धनदांडग्यांच्या कर्जमाफीसाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचा आरोप या अर्थाने खरा नाही, असे ते म्हणाले. मात्र गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळावी हीच संघटनेची भूमिका राहील, हेही त्यांनी स्पष्ट केले.  

३४ हजार कोटींचा अाकडा जाहीर करून सरकारचा प्रयत्न शेतकऱ्यांची बदनामी करण्याचा आहे का, अशी शंका शेट्टी यांनी उपस्थित केली. ‘एवढी मोठी कर्जमाफी दिल्यानंतरही शेतकरी समाधानी नाहीत. यांना राज्य गिळायचे आहे का, अशी शेतकऱ्यांची प्रतिमा शहरी वर्गात तयार होऊ लागली आहे, पण त्यांचाही दोष नाही. शेतीचे अर्थशास्त्र शहरवासीयांना माहिती नाही. सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आणि लाभाची रक्कम याचा नेमका आकडा जाहीर करण्याची गरज आहे,’ असे शेट्टींचे मत अाहे.  

सरकारी आकड्यांचा मेळ लागत नाही. त्यामुळे ३४ हजार कोटींची कर्जमाफी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची खरोखरच सरकारची तयारी आहे का, अशी शंका येते की मोठा आकडा दाखवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार आहे? हे स्पष्ट करण्यासाठी आमचे कार्यकर्ते जिल्हावार तपशील गोळा करणार आहेत. या आकडेवारीसह आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर जाऊ. मुख्यमंत्र्यांनी आमच्या शंकांचे सविस्तर निरसन करावे, अशी अपेक्षा शेट्टी यांनी व्यक्त केली.  

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सहा प्रश्न  
- जमीन धारणेची मर्यादा उठवणाऱ्या सरकारकडून कर्ज रकमेची अट का?  
- ३१ मार्च २०१६ पर्यंतचे कर्ज माफ होणार असे सरकार सांगते. मग कर्जाचे नूतनीकरण केलेल्या सहा लाख शेतकऱ्यांचे काय?  
- द्राक्ष, डाळिंब, ‘पॉलिहाऊस’च्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे व्याजसुद्धा दीड लाखापेक्षा जास्त आहे. बहुतांश शेतकरी चार-सहा एकरवाले असून त्यांच्या कर्जाचा आकडा चार- पाच लाख किंवा त्याहीपेक्षा जास्त आहे. पण म्हणून त्यांना कर्जमाफीच्या लाभातून वगळून कसे चालेल?  
- ४० लाख शेतकऱ्यांचा सात- बारा कोरा आणि एकूण ८९ लाख शेतकऱ्यांना काही ना काही लाभ एवढी आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी जाहीर करूनही शेतकऱ्यांमध्ये असंतोष का?  
- प्रत्येक जिल्ह्याची ‘लीड बँक’ दरमहा कृषी कर्ज आणि कर्जदारांचा आढावा घेते? मग सात-बारा कोरा होणाऱ्या ४० लाख शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्यास सरकारला नेमकी काय अडचण आहे? 
- सरकारने जाहीर केलेले ३४ हजार कोटींचे वाटप खरोखरच शेतकऱ्यांना होणार का?
बातम्या आणखी आहेत...